सात महिन्यांत कोल्हापूरच्या १४४ विद्यार्थ्यांना मिळाले ‘सारथी’चे बळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 01:11 PM2022-03-07T13:11:56+5:302022-03-07T13:12:44+5:30
स्पर्धा परीक्षा, पीएच.डी. करण्यासाठी त्यांना ‘सारथी’ने मार्गदर्शनासह विद्यावेतनाद्वारे मदतीचा हात
संतोष मिठारी
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेच्या कोल्हापुरातील उपकेंद्राचे कामकाज गेल्या सात महिन्यांपूर्वी सुरू झाले. त्यानंतर आतापर्यंत या केंद्राच्या माध्यमातून येथील मराठा समाजातील १४४ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ मिळाले. स्पर्धा परीक्षा, पीएच.डी. करण्यासाठी त्यांना ‘सारथी’ने मार्गदर्शनासह विद्यावेतनाद्वारे मदतीचा हात दिला. जिल्ह्यातील १८० विद्यार्थ्यांनी या केंद्राला भेट देऊन विविध योजनांची माहिती जाणून घेतली.
‘सारथी’कडून यूपीएससी, एमपीएससीची पूर्व आणि मुख्य परीक्षा, पोलीस भरती आदींबाबत ऑनलाइन प्रशिक्षण, मार्गदर्शन केले जाते. एम.फिल., पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन अधिछात्रवृत्ती योजना राबविली जाते. त्यामध्ये एम. फिल.साठी दरमहा ३१ हजार, तर पीएच.डी.साठी ३५ हजार रुपये दिले जातात. शिवाजी विद्यापीठांतर्गत पीएच.डी. करणाऱ्या ८३ विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यात येत आहे.
एमपीएससी मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या ५७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. यूपीएससीची तयारी करणाऱ्या चार विद्यार्थ्यांना (त्यातील पुण्यात प्रशिक्षण घेणाऱ्यांना दरमहा नऊ हजार, तर दिल्लीत प्रशिक्षण घेणाऱ्यांना १३ हजार रुपये) आर्थिक मदत देण्यात येत आहे. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ‘एनएमएमएस’ (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक) शिष्यवृत्ती अंतर्गत दरमहा आठशे रुपये दिले जातात. यंदा या शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यातील ४०९५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे.
विद्यार्थ्यांना सातत्याने माहिती
या उपकेंद्रात सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. त्यांची नोंदणी करून घेतली जाते. ‘सारथी’च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांची या विद्यार्थ्यांना सातत्याने माहिती दिली जाते.
रोजगार संधीसाठी प्रशिक्षण
याव्यतिरिक्त लक्षित गटातील युवक, युवतींसाठी उद्यमशीलता विकसित करण्यासाठी कृषिपूरक, औद्योगिक क्षेत्रातील रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्याची प्रक्रिया ‘सारथी’कडून सुरू आहे.
विविध योजनांबाबतची कागदपत्रे सादर करण्यासाठी सध्या विद्यार्थ्यांना पुणे येथे जावे लागते. ही कागदपत्रे कोल्हापुरातील उपकेंद्रात स्वीकारण्याची व्यवस्था लवकरच करण्यात येईल. या केंद्रासाठी पुरेसे कर्मचाऱ्यांची शासनाकडून लवकर नियुक्ती होईल. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. - अशोक पाटील, निबंधक, सारथी