गाजलेल्या निवडणुका: श्रीपतराव शिंदे अवघ्या ६७४ मतांनी जिंकले !, बंडखोरीमुळे कोल्हापूर जिल्ह्याचे लागले होते लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 13:09 IST2024-10-22T13:08:10+5:302024-10-22T13:09:57+5:30
प्रचारासाठी आले होते तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग

गाजलेल्या निवडणुका: श्रीपतराव शिंदे अवघ्या ६७४ मतांनी जिंकले !, बंडखोरीमुळे कोल्हापूर जिल्ह्याचे लागले होते लक्ष
राम मगदूम
गडहिंग्लज :१९९० ची गडहिंग्लज विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. त्या वेळी काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब कुपेकर यांचा अवघ्या ६७४ मतांनी पराभव करून ॲड. श्रीपतराव शिंदे दुसऱ्यांदा आमदार झाले होते. दोघांच्याही स्वकियांच्या बंडखोरीमुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
अॅड. शिंदे यांच्या विरोधात त्यांचेच ज्येष्ठ सहकारी, देवदासी चळवळीचे प्रणेते प्रा. विठ्ठल बन्ने यांनी अपक्ष तर कुपेकर यांच्याविरोधात त्यांचे कनिष्ठ बंधू भय्यासाहेब कुपेकर यांनी शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली होती.
तथापि, काँग्रेसचे नेते राजकुमार हत्तरकी यांनी कुपेकरांऐवजी शिंदेंना साथ दिल्यामुळे शिंदे यांचा निसटता विजय झाला. सख्खे बंधू भय्यासाहेब यांच्या बंडखोरीचा फटका कुपेकरांना बसला.
तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग तथा विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या प्रचारसभेचा फायदा शिंदेंना झाला. काँग्रेसअंतर्गत तालुक्यातील गटबाजी व कौटुंबिक वादामुळेच कुपेकरांची संधी थोडक्यात हुकली.
उमेदवारनिहाय मिळालेली मते अशी :
- श्रीपतराव शिंदे (जनता दल) : ४५९०१
- बाबासाहेब कुपकेर (काँग्रेस आय) : ४५२२७
- भय्यासाहेब कुपेकर (शिवसेना) : ८८८३
- प्रा. विठ्ठल बन्ने (अपक्ष) : २०८५