शिरोलीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी संतप्त जमावाची शाळेवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 02:13 PM2022-04-04T14:13:29+5:302022-04-04T14:22:52+5:30

आर्यनला शाळेचे अध्यक्ष गणपती पाटील यांनी आजोबा रामचंद्र बुडकर यांच्या समोर अपमानास्पद भाषा वापरून तुला शाळेतून काढून टाकतो तू सोमवार पासून शाळेत येऊ नकोस असे बोलले. यामुळे निराश झालेल्या आर्यनने गळफास घेऊन आत्महत्या केली.

In the case of a schoolboy's suicide Angry mob throws stones at school in Shiroli kolhapur | शिरोलीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी संतप्त जमावाची शाळेवर दगडफेक

शिरोलीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी संतप्त जमावाची शाळेवर दगडफेक

googlenewsNext

शिरोली : शिरोली येथील आर्यन हेरंभ बुडकर (वय-१५) या शाळकरी मुलाच्या आत्महत्या प्रकरणी आज, सोमवारी सकाळी अकरा वाजता गावकऱ्यांनी गावातून मुकमोर्चा काढला. हा मोर्चा सिमबॉलीक इंटरनॅशनल स्कूलवर जावून धडकल्यावर   शाळेचे अध्यक्ष गणपती जनार्दन पाटील आणि प्राचार्या गिता गणपती पाटील यांचा निषेध करत संतप्त जमावाने शाळेवर दगडफेक केली.

याप्रकरणी दोषींना २४ तासात अटक केली नाही तर शिरोली पोलीस ठाण्याच्यावर मोर्चा काढणार असल्याचे सरपंच शशिकांत खवरे यांनी सांगितले. या मोर्चात गावातील सुमारे पाच हजारहून अधिक लोक सहभागी झाले होते.

आर्यन हा शिरोली येथील सिमबाॅलीक इंटरनॅशनल स्कूल मध्ये दहावीच्या वर्गात शिकत होता. शुक्रवारी (दि.१) सायंकाळी शाळेत फुटबॉल खेळत असताना त्याने मारलेला बॉल चुकुन एका विद्यार्थीनींला लागला. यावरुन आर्यनला शाळेचे अध्यक्ष गणपती पाटील यांनी आजोबा रामचंद्र बुडकर यांच्या समोर अपमानास्पद भाषा वापरून तुला शाळेतून काढून टाकतो तू सोमवार पासून शाळेत येऊ नकोस असे बोलले. यामुळे निराश झालेल्या आर्यनने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आर्यन बुडकर याच्या मृत्युला शाळेचे अध्यक्ष आणि प्राचार्य जबाबदार आहेत. त्यांच्या  विरोधात गुन्हा नोंद होवून तीन दिवस उलटून गेले. पण त्यांना अजून अटक झालेली नाही. ते फरारी आहेत असे पोलीस सांगतात. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या कामावरच शंका उपस्थितीत केली. गुढीपाडव्याच्या दिवशी गणपती पाटील आणि गिता पाटील हे घरीच होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक का केली नाही असा सवाल ही आंदोलकांनी केला.

शाळेच्या आवारात आर्यनच्या श्रद्धांजलीचा डिजिटल फलक लावण्यात आला होता. तो फलक ही काढा आमच्या मुलाच्या आत्महत्येसकारणीभूत असणाऱ्यांनी आर्यनचा फलक लावू नये असा पवित्रा महिलांनी घेतला. यानंतर फलक उतरविण्यात आला. आंदोलनात शाळा बंद करा, आर्यनच्या मारेकऱ्यांना अटक करा,आर्यनला न्याय द्या,सिमबाॅलीक स्कूलचा निषेध,पालकांनो आपला पाल्य योग्य शाळेत घाला, असे फलक घेऊन लोक आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी सरपंच शशिकांत खवरे यांनी २४ तासात शाळेचे अध्यक्ष गणपती पाटील आणि गिता पाटील यांना पोलिसांनी अटक केली नाही तर पुढील आंदोलन पोलीस ठाण्याच्या आवारात करणार असल्याचे सांगितले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करतो असे आंदोलकांना आश्वासन दिले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या आंदोलनात सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, महेश चव्हाण, बाजीराव पाटील, प्रकाश कौंदाडे,माजी उपसरपंच कृष्णात करपे, तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील, सरदार मुल्ला, जोतिराम पोर्लेकर, बाजीराव सातपुते, उत्तम पाटील, मन्सूर नदाफ, प्रशांत कागले, सचिन गायकवाड, हिम्मत सर्जेखान, प्रल्हाद खोत, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: In the case of a schoolboy's suicide Angry mob throws stones at school in Shiroli kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.