..तर महाडिक यांच्या नावावर कारखान्याचा सातबारा, सतेज पाटलांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 12:04 PM2022-09-28T12:04:22+5:302022-09-28T12:04:50+5:30
..यामुळे येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन अटळ
कसबा बावडा : राजाराम कारखान्यात जर येत्या निवडणुकीत परिवर्तन झाले नाही आणि कारखान्याचा कारभार सुधारला नाही, तर येणाऱ्या काळात कारखान्याच्या सातबाऱ्यावर माजी आमदार अमल महाडिक यांचे नाव लागेल, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली.
कारखान्याच्या सभासदांमध्ये सध्या परिवर्तनाची लाट आहे. त्यामुळे राजाराम कारखाना पुन्हा एकदा सहकारी करायचा आहे. हा कारखाना गेली २५ वर्षे खाजगी झाला आहे. त्यासाठीचा हा लढा असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. राजाराम कारखान्याची येत्या ३० सप्टेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव माने होते. यावेळी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, बाहेरच्या बोगस सभासदांमुळे मागच्या निवडणुकीमध्ये शंभर दीडशे मतांपासून ते अडीचशे मतापर्यंत आघाडीचे पॅनल मागे पडले होते. आता मात्र न्यायालयीन लढाईनंतर अखेर या बोगस सभासदांचे सभासदत्व रद्द झाले आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, माजी संचालक बाबासाहेब देशमुख, जयसिंग हिर्डेकर, ॲड. प्रल्हाद लाड, रघुनाथ चव्हाण, राजू बेनाडे, प्रल्हाद शिरोटे, डॉ. मोहिते, मोहन सालपे उपस्थित होते.
महाडिकांचे प्रेम बेडकीहाळवर
बेडकीहाळ येथे महाडिक यांनी स्वतःच्या खाजगी कारखान्यात सहवीज निर्मिती, इथेनॉल प्रकल्प उभे केले. गाळप क्षमता १७ हजार मे. टनांपर्यंत नेली; पण राजाराम कारखान्याची प्रतिदिन ५ हजार गाळप क्षमता करूनसुद्धा ३२०० मे. टनाच्या वर कधी गाळप झाले नाही. याबाबत त्यांनी कधी विचारच केला नाही. त्यांचे सर्व लक्ष बेडकीहाळवर असल्याचा टोलाही पाटील यांनी लगावला.
सभासद चिवड्याच्या पाकिटाला भुलणार नाही
वार्षिक सभेमुळे चिवड्याची पाकीट आता घरपोच येत आहेत. याचा अर्थ सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आहे. इथला सभासद घरपोच चिवड्याच्या पाकिटाला भुलणार नाही. हे दाखवण्याचे काम आता करावे लागणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
आता गप्प बसायचे नाही...
राजारामची सभा आम्ही शांततेत घेणार आहे. आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या. आम्हाला काही वाद करायचा नाही. सभेत कोणी येऊन दंगा करणार असेल. सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे न देता सभा उधळून लावणार असतील, एखाद्याला टार्गेट करणार असतील तर मग गप्प बसायचे नाही. तसल्या भानगडीत पडू नका, असा इशारा सतेज पाटील यांनी महाडिक समर्थकांना दिला.