देशांतर्गत बाजारपेठेत दूध पावडर, बटरने घेतली उसळी, दूध उत्पादकांना येणार अच्छे दिन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 02:35 PM2022-03-02T14:35:16+5:302022-03-02T14:35:51+5:30

दुधाची मागणी वाढत जाईल, तशी दरात आणखी १० ते १५ टक्के वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.

In the domestic market, milk powder, butter has taken off, milk producers will have better days | देशांतर्गत बाजारपेठेत दूध पावडर, बटरने घेतली उसळी, दूध उत्पादकांना येणार अच्छे दिन

देशांतर्गत बाजारपेठेत दूध पावडर, बटरने घेतली उसळी, दूध उत्पादकांना येणार अच्छे दिन

googlenewsNext

राजाराम लोंढे

कोल्हापूर : जगात दरवर्षी दुधाच्या उत्पादनात किमान २ ते ३ टक्के वाढ होत असते. मात्र, यंदा परिस्थिती उलटी झाली असून, १० टक्के दूध घटल्याने संपूर्ण जगात दूध टंचाई भासत आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत दूध पावडर व बटरने एकदम उसळी घेतली असून, किलोमागे शंभर रुपयांची वाढ झाली आहे. आता उन्हाळा सुरू झाला असून, दुधाची मागणी वाढत जाईल, तशी दरात आणखी १० ते १५ टक्के वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.

जगात सर्वाधिक दूध उत्पादन भारतात होते. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क हे देश पुढे आहेत. गेली दोन वर्षे कोरोनामुळे संपूर्ण जगाची आर्थिक घडी विस्कटली आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे दुधाची मागणी कमी झाली आणि दूध अतिरिक्त होऊ लागले. त्याचा परिणामी दूध उत्पादनावर झाला.

आता जगभरातील मार्केट पुन्हा खुले झाल्याने दुधाची मागणी वाढली आहे. त्यात सर्वच दूध उत्पादन करणाऱ्या देशात यंदा १० टक्क्यांनी उत्पादन घटले आहे. त्याचा परिणाम मार्केटवर दिसत असून, गाय दूध पावडरचे दर २९० रुपये किलो तर बटर ३९५ रुपये किलोपर्यंत पाेहोचले आहे. साधारणत: डिसेंबरनंतर ४० ते ५० टक्के दरवाढ झाली आहे. उन्हाळा सुरू झाल्याने सगळीकडेच दुधाची मागणी वाढणार आहे. त्यापटीत दूध उपलब्ध नसल्याने दरात किमान १० ते १५ टक्के वाढ होणार, हे निश्चित आहे.

युक्रेन, रशिया युध्दाचाही परिणाम

युक्रेनमधून दूध पावडर, बटरचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते, त्यामुळे युक्रेनमधून दुबईसह इतर देशात उपपदार्थ आयात होतात. मात्र, युध्दामुळे तेथील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाल्याने पावडरसह इतर उपपदार्थांच्या दरावर परिणाम झाला आहे.

म्हशीपेक्षा गाय बटरला जादा दर

जगभरात गायीच्या दुधाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे म्हैस बटरपेक्षा किलोमागे दहा रुपये जादा दर गाय बटरला मिळत आहे.

न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया ठरवतात मार्केट

जगात लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक दूध उत्पादन न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्कमध्ये होेते. येथील प्रति माणसी दुधाचे उत्पादन भारताच्या चौपट आहे. त्यामुळे हे तीन देशच दुधाचे मार्केट ठरवत असतात.

दूध उत्पादकांना येणार अच्छे दिन

दुधाच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार येतात. एकीकडे पशुखाद्याचे दर वाढ असतानाच दुधाला तेवढा भाव मिळत नाही. मात्र, आता किमान लिटरमागे दोन ते तीन रुपयांची वाढ होणार असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार आहेत.

Web Title: In the domestic market, milk powder, butter has taken off, milk producers will have better days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.