दुधाचे दर भडकले; दूध पावडर-बटरनेही घेतली उसळी, देशांतर्गत बाजारपेठ कडाडली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 01:44 PM2022-10-22T13:44:54+5:302022-10-22T13:45:36+5:30
महाराष्ट्रासह देशभरात पावडरची चणचण भासू लागली
राजाराम लोंढे
कोल्हापूर : देशात दुधाचे उत्पादन आणि मागणी यामध्ये मोठी तफावत निर्माण झाल्याने दुधाचे दर भडकले आहेत. त्याचबरोबर दूध पावडर व बटरने ही उसळी घेतली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत सध्या दूध पावडरचा दर ३५० रुपये तर बटरचा ४५० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत किलो मागे तब्बल १०० रुपयांची वाढ झाली असून, ऐन सणासुदीच्या काळात दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे.
जगभरात ऑस्ट्रोलिया,न्यूझीलंड हे दूध उत्पादनातील मोठे देश आहेत. मात्र सध्या तिथे दुष्काळ सदृश स्थिती असल्याने अपेक्षित दूध उत्पादन झाले नाही. तिथे डिसेंबर-जानेवारी पासून दुधाचा लीन हंगाम सुरू होतो. या कालावधीत दूध उत्पादन कमी होते. त्यामुळे आगामी तीन-चार महिन्यात जागतिक बाजारपेठेत ही दूध पावडरचे दर कमी होण्याची शक्यताही धूसर आहे.
पावडरची चणचण
दूध संघाकडे पावडर ठेवण्यासाठी जागा नसायची,मात्र यंदा एक किलोही पावडर विक्रीसाठी राज्यातील कोणत्याच संघाकडे नाही. त्यामुळे सध्या महाराष्ट्रासह देशभरात पावडरची चणचण भासू लागली आहे.
‘अमूल’ची मखलाशी
‘अमूल’ने महाराष्ट्रातील दूध व्यवसाय अस्थिर करण्याची रणनीती आखली आहे. त्यातूनच खरेदी व विक्री दरात मोठी वाढ केली. मात्र गुजरातमध्ये तुलनेत दर कमी आहेत. गुजरातमध्ये फेडरेशन रोज दीड कोटी लीटरचे दूध संकलन करते,तिथे दर वाढ न करता दोन लाख लीटर संकलन करणाऱ्या महाराष्ट्रात त्यांनी दरवाढ करण्याची मखलाशी केली आहे.
दुधात भेसळीची भीती
दुधाबरोबर पावडरची टंचाई भासू लागल्याने भेसळीची शक्यताही अधिक आहे. ग्राहकांनी भेसळीपासून सावध राहण्याची गरज आहे.
पावडर आयातीसाठी हालचाली
देशांतर्गत बाजारपेठेत दूध व दूध पावडरच्या दरात मोठी वाढ झाल्याने सामान्य ग्राहकांमध्ये अस्वस्थता आहे. त्याचे पडसाद केंद्र सरकारमध्ये उमटू लागले आहेत. त्यामुळे पावडर आयात करता येईल का? याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
तर दूध दरवाढ ठरेल औटघटकेची
आयात धोरणामुळे देशांतर्गत बाजारपेठ अस्थिर झाली तर दूध व दूध पावडरच्या दरात मोठी घसरण होऊ शकते. त्यामुळे दुधाच्या दरात कपात करण्यापलीकडे दूध संघांच्या हातात काहीच राहणार नाही.
‘गोकुळ’च्या संकलनात घट
गेल्या वर्षीच्या तुलनेत ‘गोकुळ’च्या दैनंदिन दूध संकलनात तब्बल १ लाख ४४ हजार लीटरची घट आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये १४ लाख ३९ हजार लीटर संकलन होते.
ही आहेत कारणे -
- कोरोनानंतर पुन्हा नव्या दमाने मार्केट खुले झाले आहे.
- लम्पीमुळे दुभत्या जनावरे मृत्यूमुखी.
- जनावरांचे बाजार बंद.
- अपेक्षित दूध उत्पादनात वाढ नाही.
- दूध मागणीत झालेली वाढ