कोल्हापूर: गडहिंग्लज साखर कारखान्यात मुश्रीफांच्या आघाडीची विजयी घोडदौड, संपूर्ण निकाल स्पष्ट होण्यास लागणार वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 02:52 PM2022-11-08T14:52:46+5:302022-11-08T14:53:27+5:30
संचालक मंडळाच्या १९ जागांसाठी ४३ उमेदवार रिंगणात आहेत.
राम मगदूम
गडहिंग्लज: हरळी ( ता.गडहिंग्लज ) येथीलआप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार व माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील श्री. छत्रपती शाहू समविचारी आघाडीची विजयी घोडदौड सुरू असून राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील विरोधी श्री काळभैरव शेतकरी कामगार विकास आघाडी पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज, मंगळवारी(दि.८) सकाळी ८ वाजता येथील पॅव्हेलियन हॉलमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. पहिला संस्था गटातील निकालाने मुश्रीफ यांच्या आघाडीच्या विजयाची नांदी झाली. 'शाहू आघाडी'चे उमेदवार सोमनाथ अप्पी पाटील यांनी २३७ पैकी १९९ तर त्यांचे प्रतिस्पर्धी 'काळभैरव आघाडी'चे शिवाजी खोत यांना केवळ ३७ मतांवर समाधान मानावे लागले.
राष्ट्रवादीचे माजी मंत्री मुश्रीफ, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, भाजपचे नेते डॉ. प्रकाश शहापूरकर व प्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आघाडी विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार पाटील, जनता दलाचे माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे, काँग्रेसचे संग्रामसिंह नलवडे यांच्या आघाडीमध्येच दुरंगी लढत झाली. संचालक मंडळाच्या १९ जागांसाठी ४३ उमेदवार रिंगणात आहेत.
दुपारी २ वाजेपर्यंत झालेल्या ऊस उत्पादक कौलगे कडगाव गटातील मतमोजणीत मुश्रीफ आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. शहापूरकर यांच्यासह तीनही उमेदवार १८०० ते २१०० मतांनी आघाडीवर आहेत. यावरुन मुश्रीफ यांच्या आघाडीलाच स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत आहेत. रात्री उशिरापर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.