Kolhapur: निवडणुकांच्या तोंडावर राजकारणात बंडाळी माजेल, वाशीतील बिरदेव मंदिरात भाकणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 05:22 PM2024-10-04T17:22:20+5:302024-10-04T17:22:50+5:30
नेत्यांच्या वर्चस्व वादातून दिल्लीच्या गादीला हादरा बसेल, पण..
वाशी : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पक्षांमध्ये तेढ निर्माण होतील, वर्चस्व वादातून पक्षांतर्गत बंडाळी माजेल, राजकारण्यांच्या वेळकाढूपणामुळे जातीय आरक्षणाचा वाद वाढेल, याचा फटका राजकारण्यांना बसेल, दहशतवादी पाकिस्तान देश हळूहळू संपुष्टात येईल, नेत्यांच्या वर्चस्व वादातून दिल्लीच्या गादीला हादरा बसेल, पण गादी टिकून राहील, जगाच्या पाठीवर भारत महासत्ता बनेल. अशी महाराष्ट्रातील पहिली भाकणूक चार राज्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वाशी (ता. करवीर) येथील बिरदेव मंदिरात झाली. भाकणूक श्रवण करण्यासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली होती.
नवरात्रास प्रारंभ झाला. बिरोबाच्या नावानं चांगभलं, धनगरी ढोलाच्या गजरात भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत श्रींचा पालखी सोहळा जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयानी साळुंखे, हर्षवर्धन साळुंखे, मुरली पाटील, उपसरपंच सीमा पाटील, धनगर समाज बांधव, मानकरी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत भाणूस व मुख्य मंदिरात नेण्यात आला व मुख्य मंदिरातून शिवेवरील बिरदेव मंदिरात गेला.
यावेळी धनाजी बनकर यांच्यासह बनकर बांधवांनी हेडाम खेळले. देवस्थानचे देवऋषी भगवान पुजारी व भागोजी रानगे यांची भाकणूक झाली. सीमेवरील बिरदेव मंदिरातून पालखी सोहळा नानासो पाटील यांच्या घरी आला. यावेळी जय शिवराय तालीम मंडळ, पाटील गल्ली यांच्यावतीने सडा रांगोळी, फुलांच्या पायघड्या घालून स्वागत केले. तसेच आकर्षक आतषबाजी केली.
बिरदेवाच्या नावानं चांगभलं, भंडाऱ्याच्या उधळणीत रात्रभर धनगरी ओव्या, ढोल कैताळाच्या निनादात पालखी सोहळा मुख्य मंदिरात जाऊन पहाटे घटस्थापना केली.
यावेळी अध्यक्ष रघुनाथ पुजारी, उपाध्यक्ष रंगराव रानगे, मल्हार सेना सेनापती बबनराव रानगे, माजी अध्यक्ष बिरु धनगर, भागोजी पुजारी, आनंदा पुजारी, भगवान पुजारी, आनंदा राणगे, संतोष रानगे, वसंत पुजारी, सुभाना रानगे, सूर्याप्पा हजारे, कृष्णात लांडगे उपस्थित होते.