कळंबा कारागृहात अधिकाऱ्यांकडून कोळीची झडती, कारागृहातच झाली होती मारहाण; तक्रार देण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 11:30 AM2023-06-29T11:30:22+5:302023-06-29T11:31:19+5:30
जुना राजवाडा पोलिसांनी कारागृह प्रशासनाकडून माहिती मागवली
कोल्हापूर : ग्रोबझ मल्टिट्रेडिंग कंपनीद्वारे झालेल्या फसवणुकीतील संशयित आरोपी विश्वास निवृत्ती कोळी याला कळंबा कारागृहात काही तरुणांकडून मारहाण झाल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रसिद्ध करताच कळंबा कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले. कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.२८) सकाळी कोळीची झडती घेऊन चौकशी केली, तसेच जुना राजवाडा पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून कारागृह प्रशासनाकडून माहिती मागवली.
कमी कालावधीत दामदुप्पट परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ग्रोबझ कंपनीने गुंतवणूकदारांची सुमारे साडेनऊ कोटी रुपयांची फसवणूक केली. या गुन्ह्यातील संशयित विश्वास कोळी हा सध्या कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. शहरात ८ जूनला झालेल्या दंगलीनंतर काही तरुणांची कळंबा कारागृहात रवानगी झाली होती.
त्यात ग्रोबझच्या काही गुंतवणूकदारांचा समावेश होता. संशयित कोळी आयताच कारागृहात सापडल्याने तरुणांनी मारहाण करीत त्याच्याकडे गुंतवलेल्या पैशांची मागणी केली. ९ आणि १० जूनला हा प्रकार घडला. कारागृहात कोळी मोबाइलचा वापर करीत असल्याची धक्कादायक माहिती तरुणांनी दिल्याने कारागृह प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
हा सर्व प्रकार 'लोकमत'ने उघडकीस आणल्यानंतर बुधवारी सकाळी तातडीने कारागृहातील उपअधीक्षक पांडुरंग भुसारे यांनी कोळीची झडती घेतली. त्याच्या बरॅकचीही तपासणी करण्यात आली. मात्र, त्याच्याकडे मोबाइल सापडला नाही. मारहाणीबद्दल त्याची काही तक्रार नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
जुना राजवाडा पोलिसांकडून दखल
जुना राजवाडा पोलिसांनी घटनेची दखल घेऊन बुधवारी सकाळी कारागृह अधीक्षकांशी संपर्क साधला. मारहाणीच्या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती मागवल्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात सांगली येथील एका खूनप्रकरणी कळंबा कारागृहातील एक कैदी मोबाइलवरून हल्लेखोरांच्या संपर्कात होता, अशी माहिती मिळताच राजवाडा पोलिसांनी कारागृहाची झडती घेतली होती. कोळीच्या प्रकरणातही गरज पडल्यास कारागृहाची झडती घेतली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.