विधानसभेचे राजकारण: कोल्हापूर जिल्ह्यात एकमेकांशी सर्वाधिक वेळा भिडले 'हे' नेते
By राजाराम लोंढे | Published: November 4, 2024 06:52 PM2024-11-04T18:52:16+5:302024-11-04T18:53:08+5:30
राजाराम लोंढे कोल्हापूर : विधानसभेच्या आतापर्यंतच्या निवडणुकीत सर्वाधिक सहा वेळा स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक व विक्रमसिंह घाटगे, तर पालकमंत्री हसन ...
राजाराम लोंढे
कोल्हापूर : विधानसभेच्या आतापर्यंतच्या निवडणुकीत सर्वाधिक सहा वेळा स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक व विक्रमसिंह घाटगे, तर पालकमंत्री हसन मुश्रीफ व संजय घाटगे यांच्यात समोरासमोर लढाई झाली. माजी राज्यमंत्री भरमूण्णा पाटील व नरसिंगराव पाटील यांच्यात पाच वेळा, तर आमदार विनय कोरे व सत्यजीत पाटील सरूडकर यांच्यात पाचव्यांदा झुंज होत आहेत. विशेष म्हणजे, कोल्हापूर शहरासह काही मतदारसंघांत नवीन मल्लांबरोबर कुस्ती पाहावयास मिळते.
सुशिक्षित मतदारांची वाढणारी संख्या, विकास कामांची होणारी तुलना आणि त्याचे मूल्यमापन होऊन दिली जाणारी उमेदवारी, या सगळ्या पार्श्वभूमीवर अलीकडे सलग तीन-चार वेळा उमेदवारी मिळणे आणि आर्थिक दृष्ट्या कठीण बनले आहे. अशाही परिस्थितीत सलग सहा-सहा वेळा ताकदीने लढाई करणारे नेतेही या जिल्ह्याने पाहिले आहेत.
वडील आणि मुलासोबतही लढत
- ‘करवीर’मधून स्वर्गीय पी. एन. पाटील व चंद्रदीप नरके यांच्यात २००९ पासून सलग तीन वेळा लढत झाली. पाटील यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र राहुल व नरके यांच्यात सामना होत आहे.
- माजी मंत्री जयवंतराव आवळे व डॉ. सुजित मिणचेकर यांच्यात २०१४ लढत झाली होती. त्यानंतर आवळे यांचे सुपुत्र राजू व डॉ. मिणचेकर यांच्यात २०१९ व २०२४ सलग दुसऱ्यांदा लढत होत आहे.
- दिवंगत नेते यशवंत एकनाथ पाटील व विनय कोरे यांच्यात १९९९ व २००४ ला सामना झाला. त्यानंतर २०१४ ला पाटील यांचे सुपुत्र अमरसिंह यांच्यासोबत लढत झाली.
- बजरंग देसाई व के. पी. पाटील यांच्यानंतर देसाई यांचे सुपुत्र राहुल यांच्यासोबतही पाटील यांची लढत झाली.
खानविलकर, क्षीरसागर यांच्या विरोधात मल्ल वेगळेच
दिविग्जय खानविलकर यांच्या १९८० ते २००९ पर्यंतच्या निवडणुकीत २००९ चा सतेज पाटील यांचा अपवाद वगळता, कोल्हापूर शहरातून राजेश क्षीरसागर चौथ्यांदा रिंगणात, पण प्रत्येक निवडणुकीत प्रतिस्पर्धी वेगवेगळे राहिले.
एकमेकांशी सर्वाधिक वेळा भिडलेले नेते
- कागल: सदाशिवराव मंडलिक व विक्रमसिंह घाटगे - १९७२ ते १९९५
- कागल: हसन मुश्रीफ व संजय घाटगे - १९९८ ते २०१९
- चंदगड : नरसिंगराव पाटील व भरमूण्णा पाटील - १९९५ ते २०१४
- शाहूवाडी : विनय कोरे व सत्यजीत पाटील सरूडकर - २००४ ते २०२४
- सांगरूळ / करवीर : पी. एन. पाटील व संपतराव पवार - १९९५ ते २००९
- राधानगरी : के. पी. पाटील व बजरंग देसाई - १९९९ ते २००९
- राधानगरी : के. पी. पाटील व प्रकाश आबीटकर - २००९ ते २०२४
- शिरोळ : राजेंद्र पाटील यड्रावकर व उल्हास पाटील - २०१४ ते २०२४