कोरोनामुळे कर्जदार गेले..अन् ६२ कोटींचे कर्ज थकले, पश्चिम महाराष्ट्रातील चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 06:52 PM2022-12-30T18:52:46+5:302022-12-30T18:57:52+5:30
कर्ज कसे फेडायचे अशा विवंचनेत कुटुंबीय आहेत.
समीर देशपांडे
कोल्हापूर : गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे १०६१ जणांचा मृत्यू झाला असून त्यामुळे ६२ कोटी ४६ लाख रुपयांचे कर्ज थकीत असल्याचे समोर आले आहे. घरातील कर्ता माणूसच गेल्याने ही थकबाकी राहिली असून आता हे कर्ज कसे फेडायचे अशा विवंचनेत कुटुंबीय आहेत.
राज्य शासनाने महिन्याभरापूर्वी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कर्जाची सद्यस्थिती याबाबतची माहिती मागवली होती. त्यानुसार कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील कर्जाच्या माहितीचे संकलन करण्यात आले आहे. यामध्ये तीन प्रकारच्या कर्जाची माहिती घेण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी आणि सेवक पतसंस्था मालमत्ता तारण असलेले थकीत कर्जदार अशी तीन विभागात ही माहिती घेण्यात आली आहे.
नागरी पतसंस्था आणि सेवक पतसंस्थांचे सभासद आणि कर्जदार असलेले या तीनही जिल्ह्यातील ६०८ जण मृत्यू पावले असून त्या सर्वांनी २७ कोटी ५५ लाख ८ हजार ३४९ रुपये कर्ज घेतले होते. त्यातील २० कोटी ४९ लाख ३७ हजार ९९७ रुपये थकीत आहेत. तीनही जिल्ह्यातील ४५ बँकांकडे मालमत्ता तारण असलेल्या २६५ कर्जदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांनी या बँकांकडून ३२ कोटी ९० लाख, ३० हजार ८५७ रुपये कर्ज घेतले होते. त्यापैकी २१ कोटी चार लाख ६९ हजार, ६८० रुपये थकीत आहेत.
केडीसीसी बँकेचे सर्व कर्ज थकीत
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ८६ जणांना १ कोटी ५४ लाख कर्ज मंजूर केले, परंतु गेल्या दोन वर्षात हे कर्ज न फेडल्याने उलट व्याज वाढल्याने ही रक्कम आता १ कोटी ५६ लाखांवर गेली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या कर्जाची स्थिती
बँकेचे नाव | मयत कर्जदार | मंजूर कर्ज | थकीत कर्ज |
कोल्हापूर जिल्हा बँक | ८६ | १,५४,१६,४१५ | १,५५,७४.१६७ |
सांगली जिल्हा बँक | ३७२ | १०,०८,४३,०५० | ८,५४,५०,२७१ |
सातारा जिल्हा बँक | ९३० | १५,२९,२८,०७९ | १०,८२,०३,१०८ |
एकूण | १३८८ | २६,९१,८७,५४४ | २०,९२,२७,५४६ |