महाराष्ट्र केसरी स्पर्धेत यंदा 'यांच्या' नावाचा बोलबाला, विजेत्यास थार जीपसह २१ लाखांचे बक्षीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 01:16 PM2023-01-12T13:16:26+5:302023-01-12T13:17:12+5:30

तीन महाराष्ट्र केसरी एकमेकांविरोधात भिडणार

In the Maharashtra Kesari Competition, once again the names of the past winners Prithviraj Patil, Sikander Sheikh, Mauli Kokate, Prakash Bankar dominate | महाराष्ट्र केसरी स्पर्धेत यंदा 'यांच्या' नावाचा बोलबाला, विजेत्यास थार जीपसह २१ लाखांचे बक्षीस 

संग्रहीत फोटो

googlenewsNext

कोल्हापूर : पुण्यात मंगळवार (दि.१०)पासून सुरू झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुन्हा एकदा गत विजेता पृथ्वीराज पाटील, सिकंदर शेख, माउली कोकाटे, प्रकाश बनकर यांच्या नावाचा बोलबाला पुन्हा एकदा सुरू झाला आहे. यंदाच्या विजेत्यास मिळणाऱ्या चौदा लाखांच्या थार आणि उपविजेत्यास मिळणाऱ्या ट्रॅक्टरसोबत वजनी गटातील विजेत्यांना मिळणाऱ्या अडीच लाखांच्या मोटारसायकलचे कुतूहल कुस्तीगिरांसहकुस्तीप्रेमींमध्ये आहे.

कोरोनानंतर यंदाच्या वर्षात दुसरे कुस्तीगीर परिषदेचे अधिवेशन म्हणजे कुस्तीगिरांना पर्वणीच ठरली आहे. यंदाही कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील पुन्हा एकदा डबल धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने तर लष्करातील प्रशिक्षकांसह जालिंदर आबा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेले आठ महिने कसून सराव केला आहे. त्याने तर यापूर्वीच किताबावर नाव कोरल्यामुळे खुलून खेळण्याचे ठरविले आहे. त्यामुळे अनेकांना त्याच्याकडून पुन्हा कोल्हापूरसह राज्यभरातील कुस्तीगिरांकडून अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

गंगावेश तालमीतील विश्वास हारुगलेंचा पठ्ठा व मूळचा मोहोळ(सोलापूर) पण हिंगोलीचे प्रतिनिधित्व करणारा सिकंदर शेखने गत महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याचाच साथीदार प्रकाश बनकरकडून हार पत्करल्यानंतर आठ महिन्यांत देशभरातील अनेक दिग्गज कुस्तीगिरांना अस्मान दाखविले आहे.

त्याचा वारू तर प्रतिस्पर्ध्याला पहिल्या दोन मिनिटांत चितपट करायचा असा तुफान सुटला आहे. त्याचा जवळचा साथीदार व याच तालमीचा महान भारत केसरी माउली जमदाडे हाही सोलापूर(पंढरपूर)चे नेतृत्व करणार आहे. याशिवाय बानगेचा अरुण बोंगाडे आणि इचलकरंजीचा अमृतमामा भोसले यांचा पठ्ठा शुभम सिद्धनाळे यांच्याकडून मोठ्या आशा आहेत.

कोल्हापूकरांना यांच्याकडून अपेक्षा

वजनी गटात सौरभ पाटील, सोनबा गोंगाणे, विजय पाटील, किरण पाटील, अतुल चेचर, यश माने, आकाश कापडे, अतुर डावरे, शशिकांत बोंगार्डे, नीलेश हिरुगडे, कृष्णात कांबळे, बाबासो रानगे ओंकार पाटील यांच्याकडून सुवर्णपदकाच्या आशा आहेत.

बक्षिसांची खैरात

महाराष्ट्र केसरी गदा पटकाविणाऱ्याला चौदा लाखांची थार चारचाकी, पाच लाखांचे रोख बक्षीस आणि संयोजकांकडून दोन लाख असे एकूण २१ लाखांचे, तर उपविजेत्यास एक ट्रॅक्टर, अडीच लाख रुपये आणि गटातील प्रत्येक सुवर्ण विजेत्याला यझडी ही अडीच लाखांची मोटारसायकल भेट मिळणार आहे.

तीन महाराष्ट्र केसरी एकमेकांविरोधात

यंदाच्या अधिवेशनात गत विजेता पृथ्वीराज व बाला रफीक, हर्षवर्धन सदगीर असे तिघेजण महाराष्ट्र केसरी डबल धमाका करण्यासाठी उत्सुक आहेत.

पृथ्वीराजसह सिकंदरकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कारण पृथ्वीराज प्रतिस्पर्धी मल्लाला पहिल्या दोन मिनिटांतच चितपट करीत आहे. त्यामुळे त्याला महाराष्ट्र केसरीची जास्त संधी आहे. - संग्रामसिंह कांबळे, राष्ट्रीय मल्ल, मुंबई.

Web Title: In the Maharashtra Kesari Competition, once again the names of the past winners Prithviraj Patil, Sikander Sheikh, Mauli Kokate, Prakash Bankar dominate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.