कोल्हापुरात संजय मंडलिक यांच्यासाठी प्रचार रॅली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 12:10 PM2024-05-06T12:10:47+5:302024-05-06T12:11:28+5:30
'टोल आणला त्यांची आता घंटी वाजवणार'
कोल्हापूर : महायुतीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोटारसायकल रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उघड्या वाहनातून या रॅलीत सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने ही रॅली काढण्यात आली.
सकाळी अकरानंतर हळूहळू शिवसेनेचे कार्यकर्ते दसरा चौकात जमू लागले. भगवे ध्वज, भगव्या टोप्या आणि प्रचार गाण्यांनी वातावरणात रंग भरला. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या कार्यकर्त्यांनी दसरा चौकातून शहरात एक फेरी मारली. यानंतर दुपारी एकच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे यांचे दसरा चौकात आगमन झाले. त्यांच्यासह क्षीरसागर आणि सुजित चव्हाण यांनी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
ही रॅली बिंदू चौकाकडे निघाली. भगवा ध्वज फडकावत घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि शिवसेनेच्या गीतांनी चांगलीच वातावरण निर्मिती केली. शिंदे नागरिकांना अभिवादन करीत होते. यावेळी त्यांच्यासोबत शिवाजी जाधव, आदिल फरास, ऋतुराज क्षीरसागर, राहुल चव्हाण, बाबा पार्टे यांच्यासह पदाधिकारी होते. अर्धपुतळा शिवाजी चौकात शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि रॅली समाप्त झाली.
टोल आणला त्यांची आता घंटी वाजवणार
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी कोल्हापुरात वारंवार येत आहे म्हणून काहींच्या पोटात दुखत आहे. परंतु मी महापुरातही आलो, काेरोनामध्येही आलो. तेव्हा तुम्ही घरात झोपला होता. काही जणांना पराभव दिसू लागलाय. त्यामुळे संविधान बदलणार असल्याचा गैरप्रचार सुरू आहे. ज्यांनी टोल आणला त्यांची आता घंटी वाजवा.