घडवू घराघरांत संवाद; नको टीव्ही, मोबाइलचा नाद; कोल्हापुरात उपक्रमाला आले चळवळीचे स्वरूप 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 01:54 PM2023-03-25T13:54:19+5:302023-03-25T13:55:10+5:30

गावात सायंकाळी सात ते साडेआठ या कालावधीत मोबाइल आणि टीव्ही बंद

In the villages of Ambap, Vathar, Kini, Pethwadgaon, Narande, Khochi, Talsande in Kolhapur district, mobile-TV is off from 7 to 8:30 in the evening | घडवू घराघरांत संवाद; नको टीव्ही, मोबाइलचा नाद; कोल्हापुरात उपक्रमाला आले चळवळीचे स्वरूप 

घडवू घराघरांत संवाद; नको टीव्ही, मोबाइलचा नाद; कोल्हापुरात उपक्रमाला आले चळवळीचे स्वरूप 

googlenewsNext

पोपट पवार

कोल्हापूर : मुलगा, नातू मोबाइलवर, सून टीव्हीसमोर, मग मनातलं बोलायचं कुणासमोर अशी ज्येष्ठांची झालेली अवस्था, तर दुसरीकडे सतत मोबाइलमुळे अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे कधी काळी नात्यांच्या गोतावळ्यात गजबजलेला गावगाडा अबोल झाला आहे. मात्र, गावगाड्यातील हा विसंवादाचा दुष्परिणाम ओळखत कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप, वाठार, किणी, पेठवडगाव, नरंदे, खोची, तळसंदे या गावांनी सायंकाळी सात ते साडेआठ या कालावधीत मोबाइल आणि टीव्ही बंद करण्याचा उपक्रम राबविला. या गावांनी हे उपक्रम राबविल्यानंतर खरेच त्याचे परिणाम घराघरांत दिसतात का, याचा लोकमत प्रतिनिधीने धांडोळा घेतला असता सकारात्मक वास्तव समोर आले. 

या गावांनी ठरावीक वेळेत टीव्ही, मोबाइल बंद करून गावगाड्याला पुन्हा संवादाची वाट खुली करून दिली आहे. त्यामुळे या गावांनी घेतलेला हा निर्णय नातू - आजोबा, सासू - सून, मुलगा - आई यांचा तुटलेला संवाद जोडणारा ठरत आहे. मोबाइल आणि टीव्ही बंदच्या निर्णयाने माणसात माणूस राहिला, अन जेवणालाही चव आली, अशाच भावना या गावांमधील नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

अंबपमध्ये प्रभावी अंमलबजावणी

अंबपमध्ये हा उपक्रम २५ फेब्रुवारीपासून अंमलात आणला गेला. सरपंच दीप्ती माने यांनी सुरुवातीला हा उपक्रम राबविण्याअगोदर गावातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेतून आम्ही घरी गेलो की, आई टीव्ही पाहण्यात, तर बाबा मोबाइलमध्ये असल्याने आमच्याशी बोलायला कुणीच नसते, अशा या विद्यार्थ्यांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे सरपंच माने यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यास करण्याच्या वेळेत टीव्ही, मोबाइल बंद करण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी अनेक पालकांशी बोलून त्यांना विश्वासात घेतले. त्यामुळे हा उपक्रम अंबपमध्ये यशस्वी झाला आहे.

जेवणाला चव आली

टीव्ही पाहत किंवा मोबाइलवर बोलतच स्वयंपाकघरातील जेवण बनते, हा हल्लीचा अनुभव आहे. त्यामुळे जेवणही रूचकर बनत नसल्याच्या तक्रारी ज्येष्ठांकडून केल्या जातात. मात्र, टीव्ही बंदचा उपक्रम राबविलेल्या गावांमध्ये मात्र, आता आमच्या घरातील जेवणाला चव आली असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

टीव्ही, मोबाइल बंदमुळे माणूस माणसात राहिला आहे. गावात दीड तास ही उपकरणे बंद करण्याची वेळ दिली असली तरी आता चार - चार दिवस आम्ही टीव्ही सुरूही करत नाही. - विद्याराणी विभुते, गृहिणी, अंबप.

Web Title: In the villages of Ambap, Vathar, Kini, Pethwadgaon, Narande, Khochi, Talsande in Kolhapur district, mobile-TV is off from 7 to 8:30 in the evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.