Vidhan Sabha 2024: भाजप ‘दक्ष’, पश्चिम महाराष्ट्र ‘लक्ष्य’

By समीर देशपांडे | Published: September 25, 2024 11:50 AM2024-09-25T11:50:24+5:302024-09-25T11:51:02+5:30

पाच जिल्ह्यांत ५८ पैकी १७ आमदार, संख्या वाढवण्यासाठी नियोजन

In the wake of the assembly elections, BJP focused on western Maharashtra | Vidhan Sabha 2024: भाजप ‘दक्ष’, पश्चिम महाराष्ट्र ‘लक्ष्य’

Vidhan Sabha 2024: भाजप ‘दक्ष’, पश्चिम महाराष्ट्र ‘लक्ष्य’

समीर देशपांडे 

कोल्हापूर : गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा वारू रोखण्यात पश्चिम महाराष्ट्राचा मोठा वाटा होता. अंतर्गत मतभेद आणि अन्य कारणांमुळे भाजपला कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यांत म्हणावे तसे यश मिळाले नव्हते. भाजपचा मुख्यमंत्री असतानाही ५८ पैकी केवळ १७ ठिकाणी भाजपने बाजी मारली होती. ही संख्या वाढवण्याचे ‘लक्ष्य’ ठेवून भाजप ‘दक्ष’ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी महासैनिक दरबार हॉलमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये पाच जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा होत आहे.

ज्या जिल्ह्यात हा मेळावा होत आहे त्या कोल्हापूर जिल्ह्यात १० पैकी एकही आमदार भाजपचा नाही. सांगली आणि सातारा जिल्ह्यांत प्रत्येकी आठपैकी केवळ दाेन, दोन आमदार भाजपचे आहेत. पुण्यात २१ जागांपैकी ८ ठिकाणी भाजपचा विजय झाला होता. तर सोलापूर जिल्ह्यात भाजपची कामगिरी चांगली झाली होती. तेथे ११ पैकी पाच ठिकाणी भाजपला विजय मिळवता आला होता. अशा पद्धतीने ५८ पैकी १७ ठिकाणी भाजपने विजय मिळवला होता.

त्यावेळी सर्व जागा भाजपने लढवल्या होत्या. मात्र, आता महायुती म्हणून लढाई असल्याने आकडेमोड वेगळ्या पद्धतीने करावी लागणार आहे. या १७ ठिकाणी भाजपचे उमेदवार असतील; परंतु अन्य ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जागा द्याव्या लागणार असून, काही अधिक जागा भाजप पदरात पाडून घेण्याची शक्यता आहे.

सध्या राज्यात महायुतीमध्ये भाजप थोरला भाऊ आहे. त्यामुळेच केवळ भाजपचे उमेदवार जिंकणे नव्हे, तर पुन्हा सत्ता येण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांचा विजय महत्त्वाचा आहे. अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे अजूनही काही ठिकाणी असलेली नाराजी दूर करून आपली सत्ता येण्यासाठी किंतु-परंतु मनात न आणता कामाला लागा, हे सांगण्यासाठीच अमित शहा येत आहेत असे मानले जाते.

पश्चिम महाराष्ट्रातील भाजपची सद्य:स्थिती

जिल्हा -  एकूण विधानसभा जागा - भाजपचे आमदार
कोल्हापूर  -  १०  - ००
सांगली - ०८  - ०२
सातारा - ०८  - ०२
सोलापूर - ११  - ०५
पुणे  - २१  - ०८
एकूण  - ५८ - १७

जनसुराज्य, ताराराणीचे काय?

जनसुराज्यचे संस्थापक आमदार विनय कोरे आणि ताराराणी आघाडीचे संस्थापक आमदार प्रकाश आवाडे हे दोघेही महायुतीसोबत सत्तेत आहेत. त्यामुळे या ठिकाणी भाजपला त्यांच्या पाठीशी राहावे, लागणार आहे. त्यांना भाजपसोबत घेण्याचाही मध्यंतरी प्रस्ताव होता. याबाबतही आज बुधवारी चर्चा होऊ शकते.

हे नेते राहणार उपस्थित

केंद्रीय मंत्री भूपेंद्र शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुरेश खाडे, खासदार उदयनराजे भोसले, खासदार धनंजय महाडिक.

असा आहे शाह यांचा दौरा

दुपारी ३:३० वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन
४:०५ वाजता अंबाबाई दर्शन
४:२० महासैनिक दरबार हॉल आगमन
६:०५ पर्यंत भाजप पदाधिकारी मेळाव्यास उपस्थिती
६:३० वाजता कोल्हापूर विमानतळावरून दिल्लीला रवाना

Web Title: In the wake of the assembly elections, BJP focused on western Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.