सावकारांविरोधात तक्रार देण्यास अमोलची असमर्थता
By admin | Published: March 27, 2016 12:58 AM2016-03-27T00:58:13+5:302016-03-27T00:58:13+5:30
सेंट्रिंग कामगार खून प्रकरण : कारवाईचा चेंडू जिल्हा उपनिबंधकांच्या कोर्टात
कोल्हापूर : दहा ते तीस टक्के व्याजाने कर्जपुरवठा करून तिपटीने व्याज वसूल करणाऱ्या खासगी सावकारांविरोधात तक्रार देण्यास बांधकाम व्यावसायिक अमोल पवार याने असमर्थता दर्शविली आहे. पोलिसांनी त्याला ‘सावकारांविरोधात तक्रार दे,’ अशी सूचना करताच त्याने ‘विचार करून सांगतो’ असे सांगितले. त्यामुळे सावकारांविरोधातील कारवाईचा चेंडू पोलिसांनी आता जिल्हा उपनिबंधकांच्या कोर्टात टाकला आहे.
आजरा-आंबोली मार्गावर हाळोली फाट्यानजीक कारसह जळालेल्या स्थितीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उकलून कटाचा सूत्रधार असलेला अमोल व त्याचा भाऊ विनायक पवार या दोघांना अटक केली. पवार बंधूंनी खासगी सावकारांची नावे रेकॉर्डवर आणल्याने सावकारांच्या पायांखालील वाळू सरकली. पोलिसांनी संशयित खासगी सावकार प्रकाश रमेश टोणपे, सतीश गणपतराव सूर्यवंशी, दत्ता नारायण बामणे, रमेश लिंबाजी टोणपे, स्वरूप किरण मांगले, अशोक बाबूराव तनवाणी, प्रफु ल्ल अण्णासो शिराळे, सूरज हणमंत साखरे, नीलेश जयसिंगराव जाधव, पांडुरंग अण्णासो पाटील, रणजित अशोक चव्हाण, बिपीन ओमकारलाल परमार, अण्णा खोत, जयसिंगराव जाधव, प्रशांत सावंत, आदी सावकारांकडे चार दिवसांपासून चौकशी सुरू केली आहे. सकाळी दहा वाजता हे सावकार पोलिस मुख्यालयात येतात, ते रात्री अकरापर्यंत याठिकाणी थांबून असतात. या सावकारांना तिष्ठत ठेवून त्यांचा रुबाब उतरविण्याची शक्कल पोलिसांनी आखली आहे. पवार बंधूंच्या कोठडीमध्ये पोलिसांनी अमोल पवार याला सावकारांच्या विरोधात तक्रार दे, अशी सूचना केली. त्यावर त्याने ‘आपली मानसिक स्थिती बिघडली आहे. तक्रार द्यायची की नाही, याबाबत विचार करून सांगतो,’ असे उत्तर दिले. तक्रार न दिल्याने पोलिसांनी सावकारांविरोधात पुरावे गोळा करून त्याचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविण्याची तयारी केली आहे. पवार याने तक्रार दिल्यास पोलिस थेट सावकारांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करतील.
झोप उडाली!
अमोल पवार याने पोलिसांना नावे सांगितल्याने सावकारांची झोपच उडाली आहे. गेल्या चार दिवसांपासून सावकारांबरोबर त्यांच्या कुटुंबीयांचेही मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. त्यांना चौकशीसाठी बोलावून पोलिसांनी चार दिवस तिष्ठत ठेवले आहे. चौकशीसाठी पोलिस मुख्यालयाच्या पायऱ्या झिजवून सावकार हतबल झाले आहेत. चौकशीतून मुक्त कधी होतो, याची चिंता त्यांना लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)