बेहिशेबी १५ कोटींचे पुरावे दिल्यास सखोल चौकशी-वारणा लूट प्रकरण : ‘सीआयडी’चे अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:54 AM2018-03-28T00:54:28+5:302018-03-28T00:54:28+5:30
कोल्हापूर : वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुमारे १५ कोटी रुपये हे वारणा शिक्षण मंडळाचे तत्कालीन सचिव जी. डी. पाटील यांचेच असल्याचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे
कोल्हापूर : वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुमारे १५ कोटी रुपये हे वारणा शिक्षण मंडळाचे तत्कालीन सचिव जी. डी. पाटील यांचेच असल्याचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे सरचिटणीस विजयसिंह जाधव यांनी स्पष्ट केले असले तरी त्यासंबंधी पुरावे देणे महत्त्वाचे आहे. ‘सीआयडी’चा तपास हा पुराव्यांवर चालतो.
आरोपांवर चालत नाही. त्यामुळे यासंबंधीचे पुरावे दिल्यास सीआयडी व प्राप्तीकर विभागातर्फे त्यांची सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडी) पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी मंगळवारी दिली.
वारणेत सापडलेले बेहिशेबी १५ कोटी रुपये हे वारणा शिक्षण मंडळाचे तत्कालीन सचिव जी. डी. पाटील यांचेच असल्याचा गौप्यस्फोट विजयसिंह जाधव यांनी केल्याने खळबळ उडाली. या बेहिशेबी पैशांची व पाटील यांच्या संपत्तीची ‘सीआयडी’मार्फत चौकशी करावी, या मागणीचे निवेदन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि जिल्हा पोलीसप्रमुख संजय मोहिते यांना दिले आहे.
या चोरी प्रकरणाचा तपास सीआयडी करीत आहे. पोलीस अधीक्षक डॉ. बारी यांच्याकडे तपास आणि जाधव यांनी केलेल्या आरोपासंबंधी चौकशी केली असता ते म्हणाले, वारणानगर चोरीप्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. त्यांपैकी एका गुन्ह्णाचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते करीत आहेत. उर्वरित दोन्ही गुन्ह्णांचा तपास सीआयडी करीत आहे.
या दोन्ही तपास यंत्रणांनी फिर्यादी झुंजार सरनोबत यांचा जबाब घेतला आहे. त्यामध्ये बांधकाम व्यवसायातील ही रक्कम आपलीच असल्याचा कबुलीजबाब सरनोबत यांनी दिला आहे. जी.डी. पाटील यांचाही जबाब घेतला आहे. जाधव यांनी १५ कोटी रुपये हे सचिव पाटील यांचे असल्याचा आरोप केला आहे. त्यासंबंधीचे निवेदन आम्हाला प्राप्त झालेले नाही. ‘सीआयडी’चा तपास हा पुराव्यांवर चालतो, आरोपांवर नाही. त्यामुळे जाधव यांनी काही पुरावे दिल्यास सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल.
‘सीआयडी’चे सुनील रामानंद कोल्हापुरात
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद वार्षिक तपासणीसाठी मंगळवारी रात्री कोल्हापुरात आले. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या कामकाजाचा ते आज, बुधवारी आढावा घेणार आहेत. यावेळी ते वारणा चोरी तपास प्रकरणाचा आढावा घेणार आहेत. तपास अधिकाऱ्यांना काही सूचनाही ते करणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
वारणानगर चोरीप्रकरणी सीआयडी तपास करीत आहे. माझ्याकडे आलेले निवेदन ‘सीआयडी’ला वर्ग करणार आहे. त्यांच्या तपासामध्ये वारणेतील पैसे अवैध असतील तर प्राप्तीकर विभाग त्याचा तपास करील.
-विश्वास नांगरे-पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र