अपुऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांमुळे आयजीएममधील लसीकरण थांबवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:23 AM2021-05-08T04:23:52+5:302021-05-08T04:23:52+5:30
इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयामध्ये वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या, अपुरा वैद्यकीय कर्मचारी वर्ग व नागरिकांची होत असलेली गर्दी यामुळे ...
इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयामध्ये वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या, अपुरा वैद्यकीय कर्मचारी वर्ग व नागरिकांची होत असलेली गर्दी यामुळे लसीकरण मोहीम थांबविण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णालयाला मिळणारा लसीचा साठा शहरातील इतर सहा आरोग्य केंद्रांकडे वर्ग केला आहे.
आयजीएम रुग्णालयास कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले. रुग्णालयामध्ये नागरिकांची तपासणी व उपचारासाठी गर्दी होत आहे. त्यामुळे तेथे सुरू असलेल्या लसीकरण केंद्रासाठी जाण्यास नागरिक घाबरत आहेत. लसीकरण केंद्र हलविण्याची मागणी झाल्याने नजीकच्या अण्णा रामगोंडा पालिका शाळेत हलविण्याची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली होती. परंतु अजूनही प्रशासन पातळीवर त्याला मंजुरी मिळाली नाही.
दरम्यान, रुग्णालयाची क्षमता ३५० बेडची असून, शासनाने २०० बेडपर्यंत कोरोना रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी मान्यता दिली आहे. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी वर्गांवर कामाचा ताण पडत आहे. तसेच लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी, वारंवार होणारे वाद व कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण थांबविण्यात आले आहे.