महेश जाधव उत्तरचे भावी आमदार, चंद्रकांत पाटील यांचे भाकीत, संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:59 AM2018-09-07T11:59:55+5:302018-09-07T12:04:07+5:30
सर्वसामान्य नागरिकांमध्ये भाजपला पोहोचवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावलेले महेश जाधव हे ‘उत्तर’चे भावी आमदार असतील, असे भाकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कोल्हापूर : सर्वसामान्य नागरिकांमध्ये भाजपला पोहोचवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावलेले महेश जाधव हे ‘उत्तर’चे भावी आमदार असतील, असे भाकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, आमदार सुजित मिणचेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पाटील म्हणाले, जाधव यांनी पक्ष, तालीम, देवस्थान समिती या माध्यमातून जे काम केले आहे. त्याचेच फळ म्हणून सकाळपासून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे.
प्र. द. गणपुले, सुभाष वोरा, बाबा देसाई यांनी पक्ष अतिशय कठीण परिस्थितीमध्ये टिकवला; परंतु तो कार्यालयातून रस्त्यावर आणण्याचे काम जाधव यांनी केले. विधानसभेला त्यांचा शानदार विजय व्हावा, अशी नियतीची इच्छा असावी म्हणूनच गतवेळी थोडक्यात त्यांचा पराभव झाला; मात्र भाजपचा त्यांच्यावर विश्वास आहे; त्यामुळेच २0१९ च्या विधानसभेला ते नक्की आमदार होतील.
जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी सकाळपासून विविध थरातील मान्यवर आणि नागरिकांनी गर्दी केली होती. संध्याकाळी पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दूरध्वनीवरून जाधव यांना शुभेच्छा दिल्या. तसेच जनसुराज्यचे संस्थापक माजी मंत्री विनय कोरे, आमदार अमल महाडिक, माजी आमदार सुरेश साळोखे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, स्थायी समितीचे सभापती, उपमहापौर महेश जाधव, आशिष ढवळे, विजय सूर्यवंशी, सुजित चव्हाण, भाजपचे जिल्हाप्रमुख संदीप देसाई, परशुराम तावरे, भगवान काटे, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून जाधव यांना शुभेच्छा दिल्या.