महाराष्ट्रातील पहिल्या पोस्ट ्आफीस पासपोर्ट सेवा केंद्राचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
By admin | Published: March 25, 2017 03:24 PM2017-03-25T15:24:25+5:302017-03-25T15:24:25+5:30
पासपोर्ट प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी प्रयत्नशील : ज्ञानेश्वर मुळे
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २५ : पासपोर्ट सेवा देशातील प्रत्येक नागरिकाला मिळावी या हेतूने सामाजिक गुन्हे असलेल्या व्यक्तींना पासपोर्ट न मिळणे, पोलिस पडताळणीतील विलंब यासारख्या मुद्यांवर चर्चा करुन ही प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही भारतीय विदेश सेवा सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी शनिवारी दिली.
कसबा बावडा येथील रमणमळा मुख्य पोस्ट आॅफीस येथे महाराष्ट्रातील पहिल्या पोस्ट आॅफीस पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते. यावेळी सर्वश्री खासदार राजू शेट्टी, धनंजय महाडिक, संभाजीराजे छत्रपती यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, डाक विभाग गोव्याचे पोस्टमास्टर जनरल विनोदकुमार शर्मा, महापौर हसिना फरास, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर आदी उपस्थित होते.
सचिव डॉ. मुळे म्हणाले, डिसेंबर २०१६ पर्यंत पासपोर्ट मिळविण्यासाठी १५ कागपत्रांची पूर्तता करण्याची आवश्यकता होती परंतु त्यानंतर ती कमी करुन ९ करण्यात आली आहे. पासपोर्टसाठी आता ना हरकत प्रमाणपत्राची गरज नाही. अनाथश्रमातील मुले, घटस्फोटीत, दत्तक अशा प्रकरणात येणाऱ्या पासपोर्टच्या अडचणींची परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून सोडवणूक करण्यात आली आहे.
कोल्हापुरसारख्या चळवळीच्या जिल्ह्यात सामाजिक कारणांतून, सविनय कायदेभंग आदी स्वरुपाचे गुन्हे असलेल्या व्यक्तींना पासपोर्ट मिळावा यासाठी काय करता येईल यासंदर्भात परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करणार आहे व त्याकामी लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा करावा.
लोकप्रतिनिधी आणि लोकसेवक एकत्र आल्यानेच कोल्हापुरातील हे पहिले पासपोर्ट सेवा केंद्र उभे राहिले आहे. तसेच पोलिस पडताळणीतला वेळ कमी व्हावा यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन तसेच स्थानिक पातळीवर जिल्हाप्रमुख यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करु, असे मुळे म्हणाले.