'किऑस्क मशीन'वर कैद्यांची कुंडली, कोल्हापुरात बिंदू चौक सबजेलमध्ये मशीनचे उद्घाटन
By उद्धव गोडसे | Published: February 27, 2024 04:28 PM2024-02-27T16:28:41+5:302024-02-27T16:31:02+5:30
कोल्हापूर : कारागृहातील कैद्यांना त्यांच्यावरील गुन्हा, वकिलाचे नाव, न्यायालयातील तारखा, त्यांच्या फर्लो रजा, नातेवाईकांच्या भेटी अशी आवश्यक माहिती आता ...
कोल्हापूर : कारागृहातील कैद्यांना त्यांच्यावरील गुन्हा, वकिलाचे नाव, न्यायालयातील तारखा, त्यांच्या फर्लो रजा, नातेवाईकांच्या भेटी अशी आवश्यक माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे. कैद्यांची कुंडली असलेल्या किऑस्क मशीनचे मंगळवारी (दि. २७) जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांच्या हस्ते बिंदू चौक सबजेलमध्ये उद्घाटन झाले. या सुविधेमुळे कैद्यांची कुंडली किऑस्क मशीनमध्ये बंदिस्त होत आहे.
कारागृहात असलेल्या कैद्यांना त्यांनी केलेला गुन्हा आणि न्यायालयातील कामकाजाबद्दल माहिती मिळविण्यासाठी यापूर्वी कारागृह प्रशासनाकडे अर्ज करावा लागत होता. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या परवानगीने त्यांना माहिती दिली जात होती. आता मात्र, कैद्यांना आवश्यक असलेली माहिती किऑस्क मशीनद्वारे उपलब्ध करून दिली जात आहे. बिंदू चौक सबजेलमध्ये मंगळवारी टचस्क्रीन मशीनचे उद्घाटन झाले.
यावेळी बोलताना न्यायाधीश तांबे यांनी किऑस्क मशीनमुळे कामकाज गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा न्यायाधीश प्रीतम पाटील यांनी प्राधिकरण मार्फत कैद्यांसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली. यावेळी मुख्य न्यायदंडाधिकारी शैलेश बाफना, कारागृह अधीक्षक विलास कापडे, तुरुंग अधिकारी नागनाथ खैरे, विजय कुंभार, शिवाजी पाटील, महेश गडनाईक, हेमंत शिपेकर, प्रमोद बर्डे, रेहाना शेख, सरिता मोरे आदी कर्मचारी आणि कैदी उपस्थित होते.