लोकल फॉर व्होकलला प्रोत्साहन : नरेंद्र मोदी; कोल्हापुरातील एक स्थानक, एक उत्पादन स्टॉलचे लोकार्पण
By संदीप आडनाईक | Published: March 12, 2024 01:07 PM2024-03-12T13:07:36+5:302024-03-12T13:16:05+5:30
कोल्हापुरी गूळ, चपला एका स्टॉलवर
कोल्हापूर : लोकल फॉर व्होकल अशी भूमिका ठेवून रेल्वे स्थानकावर सर्वप्रकारचे स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक स्थानक, एक उत्पादन योजनेचा प्रारंभ केला आहे. यातून पर्यटनालाही चालना मिळेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.
भारतीय रेल्वेच्या आधुनिकिकरण या योजनेअंतर्गत प्रायोगिक तत्वावर विविध रेल्वे स्थानकांवर ही केंद्रे उघडली आहेत. ८५ हजार कोटीहून अधिक किमंतीच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि देशाला लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी १० वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांसह इतर रेल्वे सेवांचाही हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. कोल्हापुरातील एक स्थानक, एक उत्पादन स्टॉलचे लोकार्पणही या कार्यक्रमात मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
या समारंभाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आदी ऑनलाईन उपस्थित होते.
कोल्हापुरातील कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक म्हणाले, वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापुरसाठी सुरु करावे यासाठी खूप प्रयत्न केले. प्रतिक्षा यादीत कोल्हापुरचे नाव आहे. कांही तांत्रिक बाबींमुळे ही रेल्वे आज सुरु झाली नसली तरी लवकरच ती सुरु करण्यासाठी पाठपुरावा करु.
यावेळी भाजपचे समरजितसिंग घाटगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, रुपाराणी निकम, संजय सावंत, अजित कामत, विजयसिंह खाडे, किरण नकाते, डॉ. सदानंद राजवर्धन उपस्थित होते. या समारंभाला रेल्वेच्या गतिशक्ती विभागाचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक प्रकाश उपाध्याय, विभागीय यांत्रिक अभियंता (ऑपरेशन) दीपक खाेत, कर्मचारी आणि कल्याण निरिक्षक सुनेत्रा राणे, वाणिज्य विभागाच्या मनिषा प्रभुणे, रेल्वेचे स्टेशन व्यवस्थापक राजन मेहता, सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी, जयेश ओसवाल, मोहन शेट्टी, सदाशिव सातपुते उपस्थित होते. मुख्य कार्यालयीन अधीक्षक अनिल कदम यांनी सूत्रसंचालन केले.
कोल्हापुरी गूळ, चपला एका स्टॉलवर
रेल्वेने स्थानिक उत्पादने विक्रीला चालना मिळण्यासाठी एक स्थानक, एक उत्पादन योजना कोल्हापुर रेल्वे स्थानकांवर सुरु केले आहे. योजने अंतर्गत स्थानिक विक्रेत्यांना आपली उत्पादने विकण्यासाठी रेल्वे स्थानकांवर विशिष्ट आउटलेट दिले आहेत. यापैकी भगिरथी महिला मंचच्या स्टॉलवर कोल्हापुरी मसाले, कोल्हापुरी गूळ, बांबुच्या विविध स्वदेशी उत्पादनांचा समावेश आहे तर एका स्टॉलवर कोल्हापुरी चप्पल उपलब्ध आहेत. स्थानिक कारागीर, शिल्पकार आणि कामगारांना या स्टॉलचा फायदा मिळणार आहे.