रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांच्या समाधी स्मारकाचे पन्हाळ्यात उद्या लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 04:41 PM2020-02-07T16:41:46+5:302020-02-07T16:43:51+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांचे अमात्य व छत्रपती संभाजी महाराजांनंतर स्वराज्य सावरणारे रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांच्या पन्हाळा येथील समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा उद्या, शनिवारी होणार आहे, अशी माहिती हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य बावडेकर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव नील पंडित बावडेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचे अमात्य व छत्रपती संभाजी महाराजांनंतर स्वराज्य सावरणारे रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांच्या पन्हाळा येथील समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा उद्या, शनिवारी होणार आहे, अशी माहिती हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य बावडेकर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव नील पंडित बावडेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
सोमेश्वर तलावाशेजारील समाधी परिसरात सकाळी ११.३० वाजता शाहू छत्रपती यांच्या हस्ते हा सोहळा होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार असतील. यावेळी माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह शिवकालीन मराठा राजे व सरदार घराण्यातील वंशज उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी पाच वाजता कोल्हापुरातील श्रीमंत माईसाहेब बावडेकर प्रशालेतील सभागृहात ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचे ‘मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी खासदार संभाजीराजे उपस्थित असतील.
या कार्यक्रमाला फलटणचे नाईक निंबाळकर, भोरचे पंत सचिव, हंबीरराव मोहिते, सेनापती धनाजीराव जाधवराव, कान्होजी आंग्रे, सरदार शिरोळे, पेशवे मोरोपंत पिंगळे, खंडेराव दाभाडे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, होळकर, येसाजी कंक, कान्होजी जेधे, विठ्ठल विचूरकर, अंताजी गंधे, सरदार रास्ते, सरदार पेठे, सरदार बावणे, तानाजी मालुसरे, सरदार गरुड, ढमाले देशमुख, नातू, हिरोजी इंदलकर अशा राजे व सरदार घराण्यांतील वंशज उपस्थित राहणार आहेत.
समाधी स्मारक प्रकाशात
रामचंद्रपंत बावडेकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अमात्य होते. पुढे संभाजी महाराज यांच्या बलिदानानंतर त्यांनी कठीण परिस्थितीत स्वराज्य सावरण्याचे व टिकविण्याचे कार्य केले. त्यांना छत्रपती राजाराम महाराज यांनी ‘हुुकुमतपनाह’ हा सर्वोच्च किताब दिला.
रामचंद्रपंत यांचे ८ फेब्रुवारी १७१६ रोजी निधन झाले. त्याच कालावधीत पन्हाळ्यात त्यांची समाधी बांधण्यात आली. त्यावर त्यांचे नावही कोरण्यात आले आहे. कालौघात समाधी विस्मृतीत गेली. सबनीस व मु. गो. गुळवणी यांनी ती पहिल्यांदा प्रकाशात आणली. त्यानंतर पुढे इतिहास संशोधकांनी समाधिस्थळाचे महत्त्व व रामचंद्रपंतांचे कार्यकर्तृत्व उजेडात आणले.
२० लाख खर्चून जीर्णोद्धार
ट्र्स्टने स्वनिधीतून २० लाख रुपये खर्चून समाधी स्मारकाचा जीर्णोद्धार केला आहे. हे काम दीड वर्ष सुरू होते. जीर्णोद्धाराच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरात खाली दगड, स्मारकासमोर कमान व छोटेखानी संग्रहालय उभारण्याचा मानस आहे. त्यासाठी ३० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यासोबत परिसरात आणखी दोन समाध्या आहेत. या स्मारकांच्या देखभालीसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे.