समृद्ध शिक्षक अभियानाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:28 AM2021-09-06T04:28:35+5:302021-09-06T04:28:35+5:30
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील शिक्षकांनी आपल्या योगदानातून अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवून राज्याच्या शिक्षण विभागाला पथदर्शी होण्याचा आदर्श निर्माण केला ...
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील शिक्षकांनी आपल्या योगदानातून अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवून राज्याच्या शिक्षण विभागाला पथदर्शी होण्याचा आदर्श निर्माण केला आहे. आताच्या समृद्ध शिक्षक अभियानातही ते आपला ठसा उमटवून राज्यातील शिक्षण प्रणालीला एक वेगळा आयाम देतील, याची मला खात्री आहे. या विभागाचे नेतृत्व करताना आमच्या शिक्षकांचा मला अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार आमदार प्रकाश आबिटकर यांनी काढले. ते गारगोटी येथील इंजुबाई सभागृहात पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ‘समृद्ध शिक्षक अभियान’ आणि रक्तदान शिबिराचे उद्घाटन या संयुक्त कार्यक्रमात अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. यावेळी सभापती आक्काताई नलवडे, उपसभापती अजित देसाई, शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक बी. एम. हिर्डेकर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ऋणानुबंध परिवाराने सीपीआर रुग्णालयाच्या रक्तपेढीकडे रक्तदान केले. या रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. भुदरगड शिष्यवृत्ती पंढरी या यू ट्यूब चॅनेलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी केले तर सूत्रसंचालन राजेंद्र शिंदे यांनी केले. मुख्याध्यापक संघटनेचे तालुकाध्यक्ष के. ए. देसाई यांनी आभार मानले. यावेळी पंचायत समिती सदस्य सुनील निंबाळकर, बी. एस. पाटील, मिलिंद पांगीरेकर, श्रीकांत माणगावकर, मातले सर, प्रकाश पाटील, सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.