कोल्हापूर जिल्ह्यातील प्रोत्सहानपर अनुदान आठ दिवसांत खात्यावर; सहकार सचिवांची मनसेला ग्वाही
By पोपट केशव पवार | Updated: January 17, 2024 20:48 IST2024-01-17T20:47:59+5:302024-01-17T20:48:07+5:30
येत्या आठ दिवसामध्ये शासन निर्णय करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होतील असे आश्वासन दिले.

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रोत्सहानपर अनुदान आठ दिवसांत खात्यावर; सहकार सचिवांची मनसेला ग्वाही
कोल्हापूर : सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधून वंचित राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना त्वरित प्रोत्सहानपर अनुदान द्या अशी मागणी महाराष्ट नवनिर्माण सेनेच्या सहकार विभागाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे बुधवारी केली.
या योजनेत जाचक अटी लावल्याने जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत प्रोत्सहानपर अनुदान मिळालेले नाही. त्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, प्रसाद पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर धोत्रे यांनी सहकारमंत्री वळसे-पाटील व सहकार सचिव राजेशकुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे यांची भेट घेत कोल्हापुरातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली. यावर सचिव राजेशकुमार व सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित राहिलेले शेतकरी आणि माजी सैनिक याना अनुदान देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. येत्या आठ दिवसामध्ये शासन निर्णय करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होतील असे आश्वासन दिले. यावेळी कोल्हापूर जिल्हा संघटक पुंडलिक जाधव उपस्थित होते.