शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देणारच : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:34 AM2021-06-16T04:34:37+5:302021-06-16T04:34:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देणार, या घोषणेपासून महाविकासआघाडी सरकार बाजूला जाणार ...

Incentive grants will be given to farmers: Ajit Pawar | शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देणारच : अजित पवार

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देणारच : अजित पवार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्यातील नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देणार, या घोषणेपासून महाविकासआघाडी सरकार बाजूला जाणार नाही. राज्याच्या प्रमुखांनी विधिमंडळात जाहीर केल्याने सभागृहाच्या रेकॉर्डवर आले आहे. राज्याची आर्थिक घडी मूळ पदावर आल्यानंतर प्रोत्साहनपर अनुदान देणारच, असा पुनरुच्चार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना काय बोलतो हेच कळत नाही. त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, लॉकडाऊनचा फटका बसलेल्या रिक्षाचालक, बांधकाम मजूर, घरेलू कामगार यांना मदत दिली आहे. निर्बंधाचा त्रास होतो याची जाणीव आम्हालाही आहे. मात्र, त्याशिवाय पर्याय नसून व्यापारी वर्गानेही आणखी थोडे सहकार्य करावे.

केंद्राने मदत करूनही आघाडी सरकार टीका करते, या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर विचारले असता, जीएसटीपोटी केंद्राकडून २४ हजार कोटी यायचे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीने केंद्राला पत्र पाठवले आहे. चंद्रकांत पाटील दुर्दैवाने मंत्रिमंडळात नसल्याने त्यांना आकडे माहीत नाहीत. आम्ही सरकारमध्ये आहोत, आम्हाला सहीचा अधिकार असल्याने सर्व गोष्टी आम्ही बघतो. काही लोकांना आपण काय बोलतो, हेच कळत नाही.

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. इतर आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळण्यासाठी मार्ग काढला पाहिजे. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन बारा मागण्या केल्या. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर मराठा आरक्षणाचा विषय होता. केंद्राने आरक्षणाबाबत संसदेत बिल आणून मंजूर करावे व कायदा केल्यानंतर हा प्रश्न संपेल. याबाबत निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने अहवाल दिला असून, त्यानुसार पुढील पाऊले उचलली जातील.

-------------------------------------------

मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहण्याचा प्रत्येकाला अधिकार

नाना पटोले यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेबाबत विचारले असता, मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आपला पक्ष वाढीसाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो, त्यात गैर काय? असेही अजित पवार यांनी सांगितले.

-------------------------------------------

...तर कोल्हापुरात निर्बंध अधिक कडक

कोल्हापुरात सकाळी प्रवेश केल्यानंतर अनेकांच्या तोंडाला मास्क दिसले नाहीत, कोण पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने खिशातील रुमाल बांधून वेळ मारून नेतो, ही बाब गंभीर आहे. जर नियमाची काटेकोर अंमलबजावणी केली नाहीतर निर्बंध अधिक कडक करावे लागतील, असा इशारा पवार यांनी दिला.

Web Title: Incentive grants will be given to farmers: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.