कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार; पंचगंगेची पाणी पातळी 34 फूटावर, 66 बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 11:51 AM2022-08-08T11:51:00+5:302022-08-08T19:24:15+5:30

पंचगंगा नदीवरील 66 बंधारे पाण्याखाली

Incessant rain in Kolhapur district; Increase in Radhanagari, Dudhganga Dam water storage | कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार; पंचगंगेची पाणी पातळी 34 फूटावर, 66 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार; पंचगंगेची पाणी पातळी 34 फूटावर, 66 बंधारे पाण्याखाली

Next

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसापासून वरुण राजाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. पावसाने उघडीप घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पंचगंगेची पाणी पातळी सायंकाळी 7 वाजेपर्यंत 34 फूट 4 इंच इतकी झाली आहे. यामुळे पंचगंगा नदीवरील 66 बंधारेपाण्याखाली गेले आहेत. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूटावर असून धोका पातळी 43 फूटावर आहे.

राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरु असून धरणामध्ये पाण्याची आवक मोठया प्रमाणात सुरु आहे. यामुळे आज रात्री उशिरा किंवा उद्या दिवसभरात राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठया प्रमाणात वाढ होऊ शकते. तरी नदीकाठावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तर, गगनबावडा-कोल्हापूर रस्त्यावर मांडुकली येथे मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे. करंजफेन व कांटे शिवजवळ वारंग मळी येथे पाणी आल्याने कोल्हापूर-राजापूर वाहतुक बंद झाली आहे. तसेच बर्की पुलावर पाणी आल्याने बर्की धबधबा पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे.

राधानगरी धरण 85.95% भरले असून आज दिवसभरात धरण क्षेत्रात 150 मी.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरणाची पाणीपातळी 333.58 फूट इतकी आहे. तर धरणामध्ये 7.19 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. एकूण 2563 मी मी इतक्या पावसाची नोंद झाली असून खासगी बिओटी तत्त्वावर असलेल्या वीज निर्मिती केंद्रातून 1600 क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. यामुळे भोगावती नदी पात्रात पाणी पातळी वाढ होत आहे. तर तुळशी धरणामध्ये 2.86 टीएमसी पाणीसाठा असून, तुळशी जलाशय 82. 39 टक्के भरले आहे.

दुधगंगा धरणातून 1423 क्युसेक्सने विसर्ग

दूधगंगा धरणामध्ये सांडवा पातळीपर्यंत पाणीसाठा झाला असून धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरु आहे. आज दुपारी दोन वाजता दुधगंगा धरणाचे सांडव्यावरील 5 वक्राकार उघडले असून त्यातून 423 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे तसेच पाॅवर हाऊस मधून 1000 क्युसेक्स असा एकूण 1423 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस

जिल्ह्यात काल, दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 117.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर, हातकणंगले- 34.2 मिमी, शिरोळ -18.1 मिमी, पन्हाळा- 71.1 मिमी, शाहूवाडी- 90 मिमी, राधानगरी- 65.5 मिमी, गगनबावडा- 117.3 मिमी, करवीर- 57.8 मिमी, कागल- 44.6 मिमी, गडहिंग्लज- 44.7 मिमी, भुदरगड- 84.4 मिमी, आजरा- 84.2 मिमी, चंदगड- 79.1 मिमी, असा एकूण 60 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

66 बंधारे पाण्याखाली

पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, वेदगंगा नदीवरील- वाघापूर, निळपण, शेणगांव, म्हसवे, गारगोटी, कुरणी, बस्तवडे व चिखली, कुंभी नदीवरील- कळे, शेणवडे व मांडूकली, तुळशी नदीवरील- बीड, भोगावती नदीवरील- हळदी व राशिवडे, वारणा नदीवरील- चिंचोली असे एकूण 66 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Web Title: Incessant rain in Kolhapur district; Increase in Radhanagari, Dudhganga Dam water storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.