‘महिला दिना’च्या खर्चावरून हंगामा!
By admin | Published: June 17, 2016 10:44 PM2016-06-17T22:44:01+5:302016-06-17T23:51:01+5:30
गडहिंग्लज नगरपालिका सभा : सत्ताधारी-विरोधकांत जोरदार खडाजंगी, एकमेकांचा निषेध
गडहिंग्लज : जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालकल्याण समितीतर्फे आयोजित कार्यक्रम आणि त्यासाठी झालेल्या खर्चाच्या मुद्यावरून येथील पालिकेच्या विशेष सभेत जोरदार हंगामा झाला. यावेळच्या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांत खडाजंगीदेखील झाली. महिलांच्या अपमानाचा आरोप करून दोघांनीही एकमेकांचा निषेधदेखील नोंदविला.
नगराध्यक्ष राजेश बोरगावे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. त्रैमासिक खर्चातील महिला दिनाच्या कार्यक्रमासंदर्भात झालेली टीकाटिप्पणी आणि उधळपट्टीच्या आरोपामुळे हा विषय चिघळला. अगदी वैयक्तिक पातळीवर टीका देखील झाली. त्यातूनच सभागृहात फायली फेकाफेकीचा प्रकार घडला.
महिला दिनानिमित्त आयोजित सत्कार, आॅर्केस्ट्रा, बचत गटांचे स्टॉल्स् यासंदर्भात टीका करतानाच कार्यक्रमाच्या खर्चात उधळपट्टी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या लक्ष्मी घुगरे यांनी केला. त्यास उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले यांनीही दुजोरा दिला. त्यांच्या टीकेला व आक्षेपाला जनता दलाच्या गटनेत्या प्रा. स्वाती कोरी यांनी हरकत घेतली. महिला नगरसेविकांसह विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सत्कार, महिलांची आरोग्य तपासणी, व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम, बचत गटांच्या प्रोत्साहनासाठी प्रदर्शन-विक्री स्टॉल, आदी उपक्रमांमुळे महिलांकडून चांगल्या प्रतिक्रिया असतानाही केवळ आकसातून आरोप करून घुगरे यांनी शहरातील महिलांचा अवमान केल्याचा आरोप कोरी यांनी केला.
जनसुराज्यच्या नरेंद्र भद्रापूर यांनी त्यास दुजोरा दिला. शासनाकडून नकली पुरस्कार मिळविलेल्यांना या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही, असा टोमणा मारला. त्यातूनच फायली फेकाफेकीचा प्रकार घडला. एकाचवेळी दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप, बाके वाजविणे, यामुळे गोंधळात भर पडली.
नगराध्यक्षपद आणि महिला बालकल्याण समिती सभापतिपद भूषविलेल्या महिला नगरसेविकेकडून महिला दिनाच्या कार्यक्रमाबद्दल झालेली टीकाटीपण्णी दुर्दैवी असल्याचे मत कोरी यांनी नोंदविले. मात्र, त्यांच्या आरोपांचा इन्कार करून आपल्या मनात कोणताही आकस नसल्याचा खुलासा घुगरे यांनी केला. दोन्ही बाजूच्या ‘प्रमुख’ मंडळींनी केलेल्या मध्यस्तीमुळे या विषयावर पडदा पडला. मात्र, सभागृहाचा बहुतांश वेळ या एकाच विषयावरील चर्चेत गेला. चर्चेत विरोधी पक्षनेते रामदास कुराडे, दादू पाटील, अरुणा शिंदे, किरण कदम, हारूण सय्यद, बसवराज खणगावे, उदय पाटील यांनीही भाग घेतला. मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली. (प्रतिनिधी)
आज महालक्ष्मी मंदिर, मंगळवारी योगभवन
महालक्ष्मी मंदिराच्या प्रलंबित बांधकामास आज, शनिवारी सुरुवात आणि कोड्ड कॉलनीतील नियोजित एक कोटीच्या योगा भवनाचे भूमिपूजन मंगळवारी (दि. २१) करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष बोरगावे यांनी दिली.
ठेकेदारासाठी ‘दिलगिरी’!
नगरपालिकेच्या विकासकामांत नेहमी सहकार्य व प्रामाणिक ठेकेदार म्हणून ओळख असतानाही चुकीच्या माहितीवरून आलेल्या बातम्यांमुळे ठेकेदार भास्कर पाटील यांच्यावरील चुकीच्या दंडात्मक कारवाईबद्दल सत्ताधारी आघाडीच्या गटनेत्या प्रा. कोरींनी दिलगिरी व्यक्त केली. त्यांच्या भावनेस विरोधी पक्षनेते रामदास कुराडे व कदम यांनीही दुजोरा दिला.