सध्याच्या राज्यकर्त्यांकडूनच हिंसेच्या प्रेरणा, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरांचे परखड मत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 01:08 PM2023-06-27T13:08:12+5:302023-06-27T13:08:40+5:30
पूर्वी गुंड दहशत करायचे, पण आता सरकारनेच पोसलेले राजकारणी अल्पसंख्याक विरोध, दहशत पेरण्याचे काम पद्धतशीर करत आहेत.
कोल्हापूर : सध्याच्या राज्यकर्त्याकडूनच हिसेंच्या प्रेरणा मिळत आहेत. सामाजिक तेढ, द्वेष, दंगली, सामूहिक हिंसा यामागचे राजकीय व्यूह समजून घेतले पाहिजे असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी केले. शाहूंचे संस्कार नव्या पिढीवर व्हायला पाहिजेत अशी अपेक्षा ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी केले.
येथील केशवराव भोसले नाट्यगृहात सोमवारी आम्ही भारतीय लोकतर्फे राजर्षी शाहू सामाजिक सलोखा परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. जयसिंगराव पवार होते. शाहूंच्या विचारांची बीजपेरणी करून परिषदेचे अनोख्या पद्धतीने उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाहूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर गहू, चवळी, उडीद अशा समतेचे प्रतीक म्हणून बीजारोपणाने परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
अमोल पालेकर यांनी भाषण वाचून दाखविले. ते म्हणाले, हिंसेच्या प्रेरणा सध्याच्या राजकर्त्यांकडून मिळत आहेत. त्यांच्याकडून दहशतीचे सुरूंग पेरण्याचे काम होत आहे. प्रबोधनकारांच्या हत्या होतात पण मारेकरी सापडत नाहीत, यामागेही सरकारने पोसलेल्या राजकारण्यांचीच दहशत आहे. शाहूंच्या या भूमीतील गोविंद पानसरे तसेच दाभोळकर, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्यासारख्या प्रबोधनकारांच्या मारेकऱ्यांना अजूनही शिक्षा झालेल्या नाहीत.
पूर्वी गुंड दहशत करायचे, पण आता सरकारनेच पोसलेले राजकारणी अल्पसंख्याक विरोध, दहशत पेरण्याचे काम पद्धतशीर करत आहेत. चित्रपट, सीरिजच्या माध्यमातून समाजमाध्यमांवरील सांस्कृतिक ट्रोल आर्मी प्रत्यक्षात रस्त्यावर येत आहेत. नेहरूंची प्रतिमा तोडूनच तुम्ही आज सावरकरांची प्राणप्रतिष्ठा केली आहे. शाहू महाराज आज असते तर दंगल घडली नसती, असे पालेकर यांनी सांगितले.
डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, राजर्षी शाहू महाराज हे हृदयाने संत हेते. इतरांप्रमाणेच मुस्लीम समाजालाही त्यांनी जवळ केल्याची अनेक दाखले आहेत. शंभर वर्षांपूर्वी शाहूंनी वुई दि पिपल असे म्हटले, त्याचेच प्रतिबिंब घटनाकारांनी संविधानात नंतर केले.
उदय नारकर यांनी प्रास्तविक भाषणात २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांचा प्रचाराचा नारळ त्यांनी विद्वेषातून फोडला तरी आपण सलोख्याचा श्रीफळ वाढवून शाहू विचारांचा निर्धार करू या असे आवाहन केले. यावेळी सुभाष जाधव, दिलीप पवार, वसंत मुळीक, बाबुराव कदम, वसंतराव पाटील, डॉ. मेघा पानसरे, भारती पोवार, रफिक शेख, मुमताज हैदर व्यासपीठावर होते. यावेळी रिक्षा चालकाने पन्नास रुपये देउन सलोखा निधीस प्रारंभ केला. रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन केले. सतीशचंद्र कांबळे यांनी आभार मानले.