कोल्हाटी-डोंबारी समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 02:54 PM2018-09-05T14:54:06+5:302018-09-05T14:56:33+5:30
राज्यातील कोल्हाटी-डोंबारी समाजाचा अनुसूचित जमाती (आदिवासी)मध्ये समावेश करावा, या मागणीसाठी मंगळवारी अखिल महाराष्ट्र कोल्हाटी-डोंबारी समाज संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.
कोल्हापूर : राज्यातील कोल्हाटी-डोंबारी समाजाचा अनुसूचित जमाती (आदिवासी)मध्ये समावेश करावा, या मागणीसाठी मंगळवारी अखिल महाराष्ट्र कोल्हाटी-डोंबारी समाज संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.
दुपारी दसरा चौक येथून मोर्चाला सुुरुवात झाली. आमच्या मागण्या मान्य करा, समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, अशा घोषणा देत हा मोर्चा व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. या ठिकाणी ठिय्या मारून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष वसंतराव मोहोरकर, आदींसह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना सादर करण्यात आले. डोंबारी समाजाचे राज्यात मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. हा समाज देशातील भूमिपुत्र आहे. पूर्वी हा समाज जंगलात राहत होता. या ठिकाणी टोळ्यांमध्ये युद्ध होऊन हा समाज गावांमध्ये येऊन राहू लागला. तो उपेक्षित व वंचित आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या मूलभूत गरजाही त्याला पुरेशा मिळत नाहीत.
भिक्षा मागणे, डुक्कर पाळणे, नाचगाणे करणे, मोलमजुरी करून हा समाज जीवन जगत आहे. गावात घर नाही व शिवारात शेत नाही. गावाच्या माळावर पालामध्ये हलाखीच्या अवस्थेत हा समाज जगत असून शिक्षणाचे प्रमाणही नगण्य आहे. यासाठी या समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा.
आंदोलनात मनोहर ताथवडकर, यशवंत लाखे, चंद्रकांत जावळे, शामराव जावळे, संपतराव जावळे, विशाल डावाळे, रणजित औंधकर, पुष्पा सोनटक्के, आदी सहभागी झाले होते.