सुवर्ण शिष्यवृत्तीत दहा अभ्यासक्रमांचा समावेश
By admin | Published: November 1, 2014 12:36 AM2014-11-01T00:36:57+5:302014-11-01T00:41:29+5:30
व्यवस्थापन परिषद : सांगली, साताऱ्यातील तीन कमकुवत महाविद्यालयांना अर्थसाहाय्य
कोल्हापूर : सुवर्णमहोत्सव संशोधन शिष्यवृत्तीत नव्याने दहा अभ्यासक्रमांचा टप्प्याटप्प्याने समावेश करणे; तसेच सांगली व सातारा जिल्ह्यांतील तीन कमकुवत महाविद्यालयांना अर्थसाहाय्य देण्यास आज, शुक्रवारी शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली.
विद्यापीठ कार्यालयात कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, सचिवपदी कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे उपस्थित होते. बैठकीत सुवर्ण महोत्सव संशोधन शिष्यवृत्ती समितीच्या शिफारशीनुसार कॉम्प्युटर सायन्स अॅँड टेक्नॉलॉजी, एनर्जी टेक्नॉलॉजी, एन्व्हायर्न्मेंटल सायन्स अॅँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, फूड सायन्स अॅँड टेक्नॉलॉजी सन २०१४-१५, रुरल इन्फॉरमेटिक्स, रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट, मास्टर आॅफ रुरल स्टडीज यांचा सन २०१५-१६ साठी आणि एम. टेक्. रुरल टेक्नॉलॉजी, एमबीए रुरल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांचा सन २०१६-१७ साठी संशोधन शिष्यवृत्तीत समावेश करण्यासाठी मान्यता देण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०१४-१५ मध्ये सांगली जिल्ह्यातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उमदी; कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तासगाव आणि सातारा जिल्ह्यातील राजेंद्र महाविद्यालय, खंडाळा या कमकुवत महाविद्यालयांना अर्थसाहाय्य देण्यास मान्यता दिली. विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागात कौशल्य आणि सर्जनशीलता विकास कक्ष प्लेसमेंट सेलअंतर्गत ही मान्यता देण्यात आली. (प्रतिनिधी)