शहरातील मिळकतींचे होणार सर्वेक्षण
By admin | Published: May 17, 2015 01:09 AM2015-05-17T01:09:23+5:302015-05-17T01:09:23+5:30
खासगी संस्थेकडे काम : घरफाळा उत्पन्न वाढ शक्य
कोल्हापूर : उपनगरांत होत असलेला विस्तार, वाढत्या अपार्टमेंटस्, जुन्या इमारतींत होत असलेली नवीन बांधकामे, मिळकतीच्या वापरात होत असलेले बदल आदी बाबींची गांभीर्याने दखल घेत शहरातील सर्वच मिळकतींचे नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. हे काम पालिकेच्या कर्मचाऱ्यांऐवजी खासगी संस्थेला देण्याचा विचार असून लवकरच तशी निविदा निघणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर घरफाळ्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नात किमान चाळीस टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे.
प्रत्येक दहा वर्षांनी शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण होणे अपेक्षित असताना ते गेल्या कित्येक वर्षांत ते झालेले नाही. त्यामुळे शहराचा विस्तार होत असताना महापालिकेच्या घरफाळा उत्पन्नात म्हणावी तितकी वाढ झालेली नाही, हे आयुक्त पी. शिवशंकर यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच त्यांनी मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात सुमारे १ लाख ३० हजार मिळकती असून हे काम महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून होणे अशक्य आहे.
विशिष्ट कालमर्यादेत हे काम पूर्ण व्हावे अशी मनपा प्रशासनाची अपेक्षा आहे. या कामासाठी निविदा काढण्यात येणार असून त्याच्या शर्थी व अटींवर चर्चा केली जात आहे. शहरात अनेक इमारती नवीन झाल्या आहेत, परंतु त्यांना अद्याप घरफाळा लागू झालेला नाही. काही मिळकतधारक आम्हाला घरफाळा लागू करा म्हणून स्वत:हून मागणी करत असतात, परंतु त्यांना कर्मचारी व अधिकारी भेटत नाहीत. काही ठिकाणी तर अखंड अपार्टमेंटला घरफाळा लावलेला नाही परंतु मनपाचे कर्मचारी तेथे पोहोचलेले नाहीत. आयुक्त शिवशंकर यांनी यात लक्ष घातल्यामुळे त्यांच्याही लक्षात या गोष्टी आल्या आहेत. (प्रतिनिधी)