१५ गुंठे मिरचीतून २ लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:50 AM2020-12-05T04:50:00+5:302020-12-05T04:50:00+5:30
दत्ता पाटील म्हाकवे : सर्वच क्षेत्रात ऊस न लावता निम्मे क्षेत्रात भाजीपाला व अन्य पिके घेऊन भरघोस उत्पन्न घेण्याचा ...
दत्ता पाटील
म्हाकवे : सर्वच क्षेत्रात ऊस न लावता निम्मे क्षेत्रात भाजीपाला व अन्य पिके घेऊन भरघोस उत्पन्न घेण्याचा फंडा कौलगे(ता. कागल) येथील युवा शेतकरी सुनील शामराव पाटील यांनी राबविला आहे. त्यांनी गेल्या चार महिन्यांत मिरचीचे अवघ्या १५ गुंठ्यांतून दोन लाखांचे भरघोस उत्पन्न मिळविले आहे. याबाबत त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
पाटील यांनी १ जुलै रोजी सिझेंटा-५५३१ जातीची १२०० मिरचीची रोपे लावली. यातून ४ टन ओली व एक टन वाळलेली मिरची मिळाली. याच रानात त्यांनी उन्हाळ्यात १४ ट्राॅल्या शेणखत घालून कलिंगड केले होते. लाॅकडाऊनचा काळ असतानाही यातून त्यांना ६० हजारांपर्यंत उत्पन्न मिळाले. कलिंगड काढून त्याच मल्चिंग पेपरवर मिरचीची रोपे लावली. यासाठी त्यांना ३२ हजार खर्च आला होता.
दरम्यान, मिरचीच्या झाडाचा खोड मनगटाइतका मोठा आणि चार फूट उंचीचे झाड बनले होते. आता या सरीतून ऊस रोपेही लावण्यात आली आहेत. यासाठी त्यांना केशव पाटील (हंचनाळ), मधुकर पाटील (कौलगे)यांचे मोलाचे मार्गदर्शन, तर भाऊ अनिल पाटील व कुटुंबीयांचे सहकार्य लाभले.
चौकट
३० गुंठ्यांत उसाचे ७४ टन भाजीपाल्याकडे लक्ष देतच सुनील व अनिल या भावंडांनी दुसऱ्या ३० गुंठे क्षेत्रात उसाचे ७४.३०० टन उत्पन्न घेतले आहे. यासाठी ठिबकद्वारे खत व्यवस्थापन केले. नुकताच हा ऊस छत्रपती शाहू कारखान्याकडे नेण्यात आला.
कँप्शन
कौलगे येथील मिरचीचा तरारून आलेला प्लाॅट दाखविताना डावीकडून सुनील पाटील व अनिल पाटील
छाया : दत्तात्रय पाटील, म्हाकवे