आयकर विभाग, भारतीय सैन्य दलात नोकरी लावण्याचे आमिष; २७ तरुणांना घातला दीड कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 12:02 PM2022-09-20T12:02:01+5:302022-09-20T12:36:10+5:30
मुलांच्या पालकांनी कर्जे काढून रक्कम दिली आहेत. मात्र नोकरीच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पालकांची गाळण उडाली आहे.
कुरुंदवाड : आयकर विभागात आणि भारतीय सैन्य दलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कोलकत्ता येथील रुद्रकुमार व सुबोधकुमार या अनोळखी दोन व्यक्तींनी शहरासह कोल्हापूर जिल्हयातील २७ तरुणांना सुमारे दीड कोटीचा गंडा घातला आहे. आनंदा गणपती करडे (रा. कुरुंदवाड ता. शिरोळ) यांनी आपल्या दोन पाल्यासह इतर २५ जणांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार जिल्हा पोलिस प्रमुखासह येथील पोलिस ठाण्यात दिली आहे. दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून शहरात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना ताजी असताना नोकरीच्या अमिषाने तरुणांची फसवणूक झाल्याने शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तक्रार अर्जात करडे यांनी आपल्या दोन मुलांना आयकर विभागात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून वेळोवेळी ६१ लाख ५० हजार रुपये रुद्रकुमार याला दिले आहेत. ही रक्कम बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, आरबीएल व कँनरा बँकेत रुद्रकुमार याने दिलेल्या खात्यावर भरले आहे.
शिवाय आर्मीमध्ये नोकरी लावतो असे सांगून सुबोधकुमार (कोलकत्ता) याने करडे याच्यासह इतर २५ जणांकडून ७१ लाख ४९ हजार रुपये उकळले आहेत. त्यातील ४० लाख ७४ हजार रुपये अँक्सेस, आयडीबीआय आणि आयसीआयसीआय बँकेत भरणा केला असून ३० लाख ७५ हजार रोखीने दिले आहे. २५ जुलैपासून दोघांचेही फोन बंद लागत असल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
फसवणूक करणार्या दोघा व्यक्तींनी मुलांना ट्रेनिंगसाठी, परीक्षेसाठी दिल्ली, बेंगलोर दानापूर (बिहार), सिकंदराबाद, हैद्राबाद येथे बोलावून फसगत केली असल्याचे नमूद केले आहे.
पालकांनी कर्ज काढून दिले पैसे
फसवणूक झालेल्यांमध्ये शहरासह शिरोळ, कोल्हापूर , गडहिंग्लज आदी भागातील तरुण आहेत. मुलांच्या पालकांनी कर्जे काढून रक्कम दिली आहेत. मात्र नोकरीच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पालकांची गाळण उडाली आहे. मोठी आर्थिक फसवणूक असल्याने पोलिसांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे मार्गदर्शन मागविले असून अनोळखी व्यक्तीला शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.