माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आयकरचे छापे; सात ठिकाणी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 01:46 AM2019-07-26T01:46:36+5:302019-07-26T01:47:00+5:30
हे तर राजकीय षड्यंत्र, राष्ट्रवादीचा आरोप
कागल/कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जलसंपदामंत्री आ. हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर गुरुवारी सकाळी आयकर विभागाने छापा मारला. मुश्रीफ यांच्याशी संबंधित सात ठिकाणी एकाचवेळी ही कारवाई करण्यात आली.
मुश्रीफ यांचे कागलमधील जुने घर, कोल्हापूरमधील बंगला व कार्यालय, साडू राहत असलेला टाकाळा येथील फ्लॅट, पुण्यातील कोंढवा येथे मुलगा राहत असलेला बंगला, बेलेवाडी (पान १० वर) राहत असलेला बंगला, बेलेवाडी काळम्मा येथील खासगी असलेला सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, ब्रिक्स कंपनी चालवित असलेला गडहिंग्लज साखर कारखाना, अशा सात ठिकाणी एकाचवेळी ही छाप्याची कारवाई सुरू केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. आयकर विभागाच्या मुंबईतील मुख्य बोर्डाकडून ही कारवाई करण्यात आली. छापासत्रासाठी मुंबई, पुणे, ठाणे येथील १६ खासगी वाहनांचा इतर जिल्ह्यांतील ४८ कर्मचारी व कोल्हापुरातील आठ कर्मचारी अशा ५६ कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला.
या छाप्याचे वृत्त पसरताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कागल, गडहिंग्लज शहरांसह ठिकठिकाणी बंद आणि निषेध फेरी काढून या कारवाईचा निषेध केला. दिवसभर या परिसरात तणावाचे वातावरण होते. काही वयोवृद्ध महिला रडत होत्या. पोलिसांशी भांडत होत्या.
भाजपमध्ये येण्यास नकार दिल्याने कारवाई
हा छापा राजकीय षड्यंत्रातून टाकला गेला आहे. आ. मुश्रीफ यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास नकार दिल्याने कोणाच्यातरी सांगण्यावरून ही कारवाई केली जात आहे, असा आरोप कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी कागल येथे पत्रकार परिषदेत केला आहे.