निवडणूक काळात पैशाच्या व्यवहारांवर ‘आयकर’चा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 04:45 PM2019-03-15T16:45:02+5:302019-03-15T16:47:48+5:30

लोकसभा निवडणुुकीच्या काळात होणाऱ्या पैशांच्या व्यवहारांवर आयकर विभागाची करडी नजर राहणार आहे. १० लाखांवरील व्यवहाराची संपूर्ण तपासणी होणार असून, संशयास्पद आढळल्यात तातडीने कारवाई होणार आहे.

'Income Tax Watch' on money transactions during election period | निवडणूक काळात पैशाच्या व्यवहारांवर ‘आयकर’चा वॉच

निवडणूक काळात पैशाच्या व्यवहारांवर ‘आयकर’चा वॉच

Next
ठळक मुद्दे१0 लाखांच्या वरील व्यवहारांची तपासणी होणारकोल्हापूरसह आठ मतदारसंघांत शीघ्र कृती दल स्थापन

कोल्हापूर : लोकसभा निवडणुुकीच्या काळात होणाऱ्या पैशांच्या व्यवहारांवर आयकर विभागाची करडी नजर राहणार आहे. १० लाखांवरील व्यवहाराची संपूर्ण तपासणी होणार असून, संशयास्पद आढळल्यात तातडीने कारवाई होणार आहे.

कोल्हापूरसह हातकणंगले, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, माढा या मतदारसंघांसाठी शीघ्र कृती दल स्थापन करण्यात आले आहे. या दलांतर्गत तयार करण्यात आलेली कंट्रोल रूम मतदान होईपर्यंत २४ तास कार्यरत राहणार आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. हे सर्व काम अत्यंत गोपनीय पद्धतीने चालणार आहे, अशी माहिती आयकर विभाग (संशोधन)चे सहसंचालक पूर्णेश गुरुरानी यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.

लोकसभा निवडणुकीत पैशांचा वापर होण्याच्या शक्यतेने आयकर विभाग सतर्क झाला आहे. कोल्हापूर विभागांतर्गत महाराष्ट्रातील लोकसभेचे आठ मतदार संघ येतात. या मतदार संघांमध्ये निवडणुकीच्या काळात होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर संपूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी आयकर विभागाने विशेष यंत्रणा कामाला लावली आहे.

या संदर्भात जनतेनेही सहभाग नोंदवावा, या हेतूने कंट्रोल रूमसह व्हॉट्स अ‍ॅपवर तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे पूर्णेश गुरुरानी यांनी सांगितले. १० लाखांच्या वर एकाच वेळी खात्यावर व्यवहार झाल्यास बँकांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. के.वाय.सी.ची पूर्तता करून ती रक्कम दुसऱ्या बँकेत भरावयाची असल्यास रोकड घेऊन जाणाऱ्या वाहनांवर वॉच ठेवला जाणार आहे.

यात बेहिशेबी रक्कम आढळल्यास ती जप्त करून १३२ कलमानुसार त्यावर पुढील कार्यवाही सुरू होणार आहे. सापडलेल्या रकमेचा अहवाल ४८ तासांच्या आत निवडणूक आयोगाकडे आयकर विभागाकडून पाठविला जाणार आहे, असेही गुरुरानी यांनी सांगितले. यावेळी ‘आयकर’चे उपसंचालक वैभव ढेरे, आयकर अधिकारी प्रकाश मोहिते उपस्थित होते.

विमानतळही ‘आयकर’च्या कक्षेत

जिल्ह्यातील आठ मतदारसंघांसह विमानतळावरही एक दल कार्यरत राहणार आहे. तेथे येणारी विमाने व हेलिकॉप्टरची तपासणी होणार आहेत. आठ मतदारसंघांत सात अधिकारी, दोन आयटी विस्तार अधिकारी, तीन आयकर अधिकारी या दलामध्ये कार्यरत राहणार आहेत.

व्हॉट्स अ‍ॅपवर तक्रार करता येणार

प्रचारकाळात पैसे वाटप होत असतील तर फोटो व व्हिडीओ आयकर विभागाच्या ७४९८९७७८९८ या क्रमांकावर पाठविता येणार आहेत. यावर आलेल्या तक्रारीस अनुसरून कारवाई सुरू होणार आहे. तसेच कंट्रोल रूममध्ये १८००२३३०७०० व १८००२३३०७०१ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. येथे मतदार निवडणुकीच्या संदर्भातील तक्रारी करू शकणार आहेत.

बँका, हॉटेलवर करडी नजर

बँकांमधून रोकड नेली जाणार असल्याने तेथे आणि ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बैठका होतील, अशा हॉटेलवर या शीघ्र कृती दलाची करडी नजर असणार आहे. अशा हॉटेलची यादी तयार करण्यात आली असून, तेथे कायमस्वरूपी पहारा राहील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय जी ठिकाणे संवेदनशील वाटत आहेत, त्यांची स्वतंत्र यादी तयार करून ठेवण्यात आली आहे.
 

 

Web Title: 'Income Tax Watch' on money transactions during election period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.