शिरोळमधील मिळकतींचे नूतनीकरण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:29 AM2021-08-28T04:29:31+5:302021-08-28T04:29:31+5:30
शिरोळ : चतुर्थ वार्षिक कर आकारणीअंतर्गत शिरोळ शहरातील सर्व मिळकतींचे फेर सर्वेक्षण करणे, कल्लेश्वर तलाव सुशोभीकरणाच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी ...
शिरोळ : चतुर्थ वार्षिक कर आकारणीअंतर्गत शिरोळ शहरातील सर्व मिळकतींचे फेर सर्वेक्षण करणे, कल्लेश्वर तलाव सुशोभीकरणाच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी देणे यासह सभेपुढील दहा विषयांना नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. ऑनलाईन झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील होते. दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी घोषित केल्यानुसार नैसर्गिक ओढे, नाले स्वच्छता मोहिमेसाठी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून ही मोहीम राबविण्याचाही निर्णय यावेळी झाला.
सन २०२१-२२ ते २०२४-२५ सालातील चतुर्थ वार्षिक कर आकारणीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या हद्दीतील सर्व मिळकतींचे फेर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शहरात किती मिळकतीमध्ये वाढ झाली, याच्या नोंदी घेऊन मिळकतींचे नूतनीकरण केले जाणार आहे. शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट पोलवरती स्ट्रीट लाईट व्यवस्था करण्यासाठी बल्ब खरेदी करणे, कल्लेश्वर तलावातील मत्स्य लिलावाचा ठेका देणे, अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नळ पाणीपुरवठ्याच्या झालेल्या नुकसानीची देखभाल दुरुस्ती करणे, शहरातील वस्त्यांची व रस्त्यांची जातिवाचक नावे बदलून महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याबरोबरच पालिकेचे सांस्कृतिक सभागृह दुरुस्ती करणे आदी ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी, उपनगराध्यक्ष राजेंद्र माने यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
-------------
चौकट - अभिनंदनाचा ठराव
गावठाण हद्दवाढीला महाविकास आघाडी सरकारने दिलेली मान्यता, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शहर विकासासाठी निधी दिल्याबद्दल नगरसेवक तातोबा पाटील यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला.