घरफाळा, पाणीपट्टी गळती रोखल्यास उत्पन्न वाढेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:27 AM2021-02-11T04:27:07+5:302021-02-11T04:27:07+5:30
कोल्हापूर : नव्याने करवाढ करण्यापेक्षा घरफाळा तसेच पाणी पुरवठा विभागातील गळती थांबवा, अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रामाणिकपणे काम करायला सांगा. जर ही ...
कोल्हापूर : नव्याने करवाढ करण्यापेक्षा घरफाळा तसेच पाणी पुरवठा विभागातील गळती थांबवा, अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रामाणिकपणे काम करायला सांगा. जर ही गळती रोखली, तर महापालिकेचे उत्पन्न आपोआपच वाढेल. त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशी सूचना कृती समितीतर्फे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना करण्यात आली. करवाढीचे प्रस्ताव रद्द करावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, आयुक्तांच्या अनुपस्थितीत झालेल्या चर्चेवेळी उपायुक्त निखिल मोरे यांनी घरफाळा, पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव माझ्याकडे अथवा आयुक्तांकडे अद्याप आले नसल्याचा खुलासा केला.
महानगरपालिकेच्या प्रस्तावित घरफाळा व पाणीपट्टी वाढीविरोधात निवेदन देण्यासाठी कृती समितीचे शिष्टमंडळ बुधवारी प्रशासक बलकवडे यांना भेटले. तेव्हा निवास साळोखे, ॲड. बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, अनिल घाडगे यांनी प्रस्तावित करवाढ कशी चुकीची आहे, हे पटवून सांगितले. त्यांनी काही पर्याय सुचविले असून, या पर्यायानुसार प्रशासनाने जर प्रामाणिक प्रयत्न केले, तर कसलीही करवाढ करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.
बाबा इंदूलकर यांनी मुद्देसूद मांडणी केली. शहरातील ३५० घरफाळा प्रकरणे १९९६ पासून न्यायालयात प्रलंबित आहेत. या प्रकरणावर निकाल लावून घेतला, तर २८ कोटींचा महसूल मिळणार आहे. दहा हजार मिळकतींचे असेसमेंट झालेले नाही. २५४ कोटींची थकबाकी आहे ती वसुलीसाठी प्रयत्न झालेले नाहीत. पाणी पुरवठा विभागातील गळती मोठ्या प्रमाणात आहे. ७० एम.एल.डी. पाण्याचे बिलिंग होत नाही. म्हणजे वर्षाला २७ कोटींचे पाणी वाहून जाते. ते रोखण्याचा प्रयत्न केला, तर तेवढे उत्पन्न वाढू शकते. प्रशासनाने जर होणारे नुकसान रोखले आणि प्रामाणिकपणे घरफाळा वसूल केला, तर करवाढ करण्याची आवश्यकताच नाही, असे इंदूलकरांनी पटवून दिले.
यावेळी जयकुमार शिंदे, अशोक भंडारे, महादेव पाटील सुभाष जाधव, बाबासाहेब पोवार, संदीप घाटगे, सुनील धरपणकर, अमरसिंह निंबाळकर, प्रकाश घाटगे, फिरोजखान उस्ताद उपस्थित होते.
(फोटो देतोय )