बालिंगेतील पेयजलचे काम अपूर्ण; ग्रामपंचायतीच्या दारातच योजनेचा पंचनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:50 AM2020-12-11T04:50:33+5:302020-12-11T04:50:33+5:30
कोपार्डे : बालिंगे (ता. करवीर) गावची पेयजल योजना गेली आठ वर्षे रखडली असल्याचा आरोप करत या योजनेच्या अपूर्ण ...
कोपार्डे : बालिंगे (ता. करवीर) गावची पेयजल योजना गेली आठ वर्षे रखडली असल्याचा आरोप करत या योजनेच्या अपूर्ण कामाचा पंचनामाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामपंचायतीसमोर डिजिटल फलक लावून केला आहे. बालिंगा ग्रामपंचायतीच्या दारात पेयजल योजनेत असलेल्या अपूर्ण कामाचा पाढा वाचला आहे. सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासक असले तरी ही योजना ज्या पदाधिकाऱ्यांच्या काळात झाली आहे, त्यांंना कार्यालयात जाता-येता या डिजिटल फलकाचा मुकाबला करावा लागत आहे. यामध्ये अपूर्ण कामाचे फोटो ठळकपणे छापले आहेत.
बालिंगे गावच्या पेयजल योजनेचे काम सन २०१३ ते २०१६ च्या कालावधीत करण्यात आले; पण तत्कालीन ग्रामपंचायत सदस्यांनी योजना पूर्ण झाल्यानंतर त्याची चाचणी करून ती पूर्ण क्षमतेने गावाला पाणीपुरवठा करू शकते, याबाबत ठराव ग्रामसभेत मांडायला हवा होता. पण असा ठरावच ग्रामसभेत न घेता ती कार्यान्वित केली. आजही या योजनेची मीटर जोडणी अपूर्ण आहे, मुबलक पाणी नाही, जुन्या पाईपलाईनमधूनच निम्म्या बालिंगा गावाला पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
ग्रामपंचायतीकडून मीटरप्रमाणे ग्रामस्थांकडून पाणी बिल वसूल केले जात नाही. नळ जोडणीसाठी आवश्यक असणारे पाणी मीटर संबंधित ठेकेदाराने बसवून द्यावयाचे आहेत. त्यासाठी कोणतेही जादा शुल्क ग्रामस्थांनी अदा करायचे नाही; पण नळजोडणीला जादा पैसे आकारणी करून ग्रामस्थांची लूट सुरू आहे. जोपर्यंत मुबलक व शुद्ध पाणी मिळत नाही, तोपर्यंत पाणी बिल ग्रामस्थांनी भरू नये, असे आवाहनही मनसेने डिजिटल फलकावर केले आहे.
कोट
बालिंगा गावची दिवसेंदिवस लोकसंख्या व नागरी वस्ती वाढत असून, याच धर्तीवर पेयजल योजना मंजूर झाली; पण गेली सात-आठ वर्षे या योजनेच्या प्रारूप आराखड्याप्रमाणे काम न झाल्याने ग्रामस्थांना मुबलक व शुद्ध पाणी मिळत नाही. पेयजलची चौकशी लावण्यासाठी फलक लावला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे.
अमित पाटील (मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष)
फोटो १० बालिंगा मनसे आंदोलन
बालिंगा (ता. करवीर) येथे पेयजल योजनेतील अपुऱ्या कामाचा तपशील देणारे डिजिटल लावल्याने ते येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधत आहे.