गाभारा प्रवेशासंदर्भात अपुरी सुनावणी आज
By admin | Published: April 28, 2016 12:53 AM2016-04-28T00:53:47+5:302016-04-28T00:55:38+5:30
या सुनावणीत जिल्हाधिकारी अमितकुमार सैनी व जिल्हा पोलिसप्रमुख प्रदीप देशपांडे यांना स्वत: जातीने न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते;
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर गाभारा प्रवेशासंदर्भात जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर (रिट पिटिशन) बुधवारी सुनावणी झाली. अपूर्ण असलेल्या सुनावणीचा निर्णय आज, गुरुवारी होण्याची शक्यता आहे. मूळ याचिकाकर्ते गजानन मुनीश्वर, शिवकुमार शिंदे यांच्यासह नऊ प्रतिवादींचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी या सर्वांना हजर राहण्याचे आदेश न्यायमूर्ती आर. एम. सावंत यांनी दिले होते. करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात श्रीपूजक आणि त्यांचे मदतनीस वगळता इतर कोणालाही प्रवेश देऊ नये, यासाठी तूर्तातूर्त मनाई आदेश मिळण्याची मागणी करणारा अर्ज गजानन मुनीश्वर आणि शिंदे यांनी दाखल केला होता. त्यावर दुसरे सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) प्रेमकुमार शर्मा यांनी सुनावणी घेऊन हा अर्ज फेटाळून लावला. या सुनावणीत जिल्हाधिकारी अमितकुमार सैनी व जिल्हा पोलिसप्रमुख प्रदीप देशपांडे यांना स्वत: जातीने न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते; पण सैनी व देशपांडे यांनी प्रतिनिधी हजर ठेवले होते. तसेच हजर राहण्याच्या आदेशासंदर्भात उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केली होती. या रिट पिटीशनवर बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यातील अपूर्ण राहिलेल्या सुनावणीचा निर्णय आज, गुरुवारी सकाळी अकरा वाजता होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)