गावठाण हद्दवाढ करुन सामान्य नागरिकांची गैरसोय दूर करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:28 AM2021-09-04T04:28:42+5:302021-09-04T04:28:42+5:30
कबनूर : ग्रामस्थांच्या हितासाठी कबनूर गावची गावठाण हद्दवाढ करणे गरजेची आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विषयानुसार असणाऱ्या सर्व विभागांना सूचना देऊन ...
कबनूर : ग्रामस्थांच्या हितासाठी कबनूर गावची गावठाण हद्दवाढ करणे गरजेची आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विषयानुसार असणाऱ्या सर्व विभागांना सूचना देऊन गावची गावठाण हद्दवाढ करावी, अशा मागणीचे निवेदन हातकणंगले तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्मा पापालाल सनदी यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.
या निवेदनात, कबनूर गावची लोकसंख्या सन २०११च्या जनगणनेनुसार ३९,००० इतकी आहे. मात्र, सध्या लोकसंख्या सुमारे ६०,००० आहे. भौगोलिक क्षेत्र १०३२ हेक्टर आर इतके असून, त्यामध्ये बिगरशेती जमिनी १४५ हेक्टर आर पडसर १५५ हेक्टर आर व जिरायत जमीन जवळपास ५४७ हेक्टर आर आहे. त्यामध्ये जनावरांचे गोठे व रहिवासी करणासाठी वापर होत आहे. त्याचप्रमाणे गावठाण क्षेत्र १३ हेक्टर आर आहे. असे एकूण क्षेत्र जवळपास ९०० हेक्टर आर आहे. त्यामध्ये गावठाणमध्ये २५०० घर मिळकती आहेत. इतर गावठाण हद्दीबाहेरच्या जवळपास ६३३४च्या घर मिळकती ग्रामपंचायतीकडे नोंद आहेत. तसेच नागरिक रहिवासी व आपला छोटा-मोठा व्यवसाय करत असल्याने या क्षेत्राला सध्या नागरी वस्ती म्हणून बघितले जाते व त्यांना शासकीय निधीचा वापर करून नागरी सुविधा देण्याचा सर्वच लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असतात. तथापि, शासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे त्याची नोंद व्यवस्थित न केल्याने नागरिकांना ७/१२ पत्रकी नावे नोंद कमी-जादा करणे, खरेदी-विक्री त्याचप्रमाणे बँकेचे कर्ज बोजा जादा-कमी करणे अवघड झाले असून, यामुळे शासनाचा हजारो रुपयांचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागतो. या सर्व बाबींचा विचार करता कबनूरची हद्दवाढ करणे जरुरीचे असल्याचे म्हटले आहे.