वाढे सारे विक्रीला, शेतकऱ्याला धतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:17 AM2021-01-10T04:17:32+5:302021-01-10T04:17:32+5:30

शरद यादव कोल्हापूर : ऊस तोडल्यानंतर ५० टक्के वाढे शेतकऱ्यांना द्यावे, असा मार्गदर्शक नियम आहे; पण या नियमाला कात्रजचा ...

Increase all sales, farmers dhatura | वाढे सारे विक्रीला, शेतकऱ्याला धतुरा

वाढे सारे विक्रीला, शेतकऱ्याला धतुरा

googlenewsNext

शरद यादव

कोल्हापूर : ऊस तोडल्यानंतर ५० टक्के वाढे शेतकऱ्यांना द्यावे, असा मार्गदर्शक नियम आहे; पण या नियमाला कात्रजचा घाट केव्हाच दाखवण्यात आला आहे. तोड सुरू असताना शेतकरी वाढे मागायला गेला तर केवळ ५ पेंड्या देऊन बाकीचे सर्व वाढे विकले जातात. अनेक ठिकाणी शेतकरी आपल्याच फडातील वाढे विकत घेतो. एकूणच प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना नागवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. अन्यायाचे हे दुष्टचक्र असेच सुरू राहणार आहे. याविरोधात वेळीच आवाज उठविला नाही तर साखर उद्योगच मोडून पडण्यास वेळ लागणार नाही.

साखर कारखाने लक्ष देत नाहीत, चिटबॉयच कोणी ऐकत नाही, टॅक्टरमालक व मजूर म्हणतील तो दर व तोच तोडणीचा कार्यक्रम, चालकाची एन्ट्री वाढत जाणार असा सारा अंधा कानून सुरू असल्याने अल्पभूधारक शेतकरी पुरता हरला आहे. यावर मार्ग परदेशातून कोणी मसिहा येऊन काढणार नसून आता शेतकऱ्यांनीच एकत्र येऊन जोरदार आवाज उठविण्याची वेळ आली आहे.

................

संचालक करतात काय?

कोल्हापूर जिल्ह्यात एका गावाआड कोणत्या तरी कारखान्याचा संचालक आहे. ऊसतोडणी यंत्रणेचा बोजवार उडाला असताना संचालकांनी यात हस्तक्षेप करून शिस्त लावण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक गावात बैठका घेऊन ऊसतोडीसाठी पैसे देणार नाही, क्रमपाळीनुसारच तोडणी होईल, चालकाला रुपयाही मिळणार नाही, असा ठराव ते काय? करत नाहीत. केवळ कारखान्याच्या मासिक मीटिंगला जाऊन चहा-बिस्कीट खाण्यासाठी संचालक झाला आहात काय, असा संतप्त सवाल शेतकरी विचारू लागले आहेत.

..........

कोट...

आम्ही कारखान्यांकडून पत्रे घेऊन ५० टक्के वाडे शेतकऱ्यांना द्यायला लावले आहे, तसेच शिरोळ तालुक्यात एकही रुपया न देता ऊसतोडणीचा कार्यक्रम राबवत आहोत. शेतकऱ्यांनीही तक्रार करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. तसेच गावागावात कार्यकर्ते तयार झाले व त्यांनी याविरोधात आवाज उठविला तरच हा प्रश्न निकालात निघेल.

धनाजी चुडमुंगे,

आंदोलन, अकुंश संघटना

............

कोट....

ऊसतोडणीसाठी पैसे मागणे आता सर्रास झाले आहे. वाडे मागितले तर ते मोळ्यांच्या खाली टाकून देतात. यावर तक्रार केली तर जाणीवपूर्वक वाड्यात चार कांंड्या ऊस धरून तसेच जमिनीलगत ऊस न तोडता नुकसान करण्याचे काम सुरू आहे. साखर कारखान्यांनी यावर कडक कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे.

-शाहू गायकवाड,

शेतकरी, हुपरी (ता. हातकणंगले)

............

‘लाेकमत’ची भूमिका...

खुशाली नव्हे खंडणी ही मालिका आम्ही तीन भागात मांडली. यावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया मांडल्या. जिल्ह्यात सर्व पातळीवर शेतकऱ्यांची लूट सुरू असताना साखर कारखानदार, लाेकप्रतिनिधी, प्रशासन गांधारीची भूमिका घेऊन स्वस्थ कसे काय बसू शकतात, असा सवालही उपस्थित झाला. या ज्वलंत विषयावर मार्ग काढत शेतकऱ्यांची गळचेपी थांबावी, यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व कारखानदार, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, शेतकरी यांची सर्वसमावेशक बैठक घ्यावी व यातून ऊसतोडीवर कुणाचे तरी नियत्रंण राहील, यासाठी कार्यक्रम तयार करावा. जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याची सधन समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात, अशी ससेहोलपट होणे बरे नाही. यात लोकमत प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांबरोबर असेल.

Web Title: Increase all sales, farmers dhatura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.