जलयुक्त शिवार पत्रकार पुरस्कारांच्या रक्कमेत भरघोस वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 04:27 PM2017-10-06T16:27:38+5:302017-10-06T16:27:38+5:30

जलयुक्त शिवार अभियान वृत्तपत्रातून पोहोचविणाऱ्या पत्रकारांना राज्य शासनाच्यावतीने गत वर्षीपासून राज्य, विभाग तसेच जिल्हा या तीन स्तरांवर पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीच्या सन 2016-17 च्या पुरस्काराच्या रकमेत शासनाने भरघोस वाढ केली आहे.

Increase in the amount of water scarcity journalist award | जलयुक्त शिवार पत्रकार पुरस्कारांच्या रक्कमेत भरघोस वाढ

जलयुक्त शिवार पत्रकार पुरस्कारांच्या रक्कमेत भरघोस वाढ

Next

कोल्हापूर, दि. 5 : महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानात वृत्तपत्रातून तसेच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाव्दारे जलसंधारणाचे महत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या पत्रकारांना राज्य शासनाच्यावतीने गत वर्षीपासून राज्य, विभाग तसेच जिल्हा या तीन स्तरांवर पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीच्या सन 2016-17 च्या पुरस्काराच्या रकमेत शासनाने भरघोस वाढ केली असून या बाबतचा शासन निर्णय दि. 9 ऑगस्ट 2017 रोजी निर्गमीत करण्यात आला आहे.

या नवीन निर्णया नुसार राज्यस्तरीय प्रथम बक्षीस 1 लाख रुपये, विभागीय स्तरावरील प्रथम बक्षीस 50 हजार रुपये तर जिल्हास्तरीय प्रथम बक्षीस 31 हजार रुपये करण्यात आले असून प्रवेशिका विहीत नमुन्यात सादर करण्याची मुदत दि. 20 आक्टोबर 2017 पर्यंत आहे.

यावर्षी दि. 9 ऑगस्ट 2017 रोजी जलसंधारण विभागाने निर्गमीत केलेल्या शासननिर्णयानुसार पुरस्काराचे स्वरूप, पात्रतेच्या अटी, निकष तसेच पुरस्कारासंबंधी निवड समितीची रचना यामध्ये अंशता बदल करण्यात आले आहेत. या शासन निर्णयानुसार सन 2016-17साठी व त्यानंतरच्या कालावधीत निवड करण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी जिल्हास्तरावरून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी व गुणांकन त्या त्या विभागातील विभागीय पुरस्कार निवड समितीमार्फत न करता सदर प्रस्तावांची छाननी व गुणांकन अन्य विभागातील विभागीय पुरस्कार निवड समितीमार्फत करण्यात यावी.

 विभागीय समित्या अथवा त्यांनी नियुक्त केलेली व्दिसदस्यीय समिती अन्य विभागातील प्राप्‍त प्रस्तावांची छाननी करुन अंतिम गुणांकन करेल. नाशिक विभागीय समिती कोकण विभागाचे, कोकण विभागीय समिती पुणे विभागाची, औरंगाबाद विभागीय समिती नाशिक विभागाची, अमरावती विभागीय समिती औरंगाबाद विभागाची, पुणे विभागीय समिती नागपूर विभागाची तर नागपूर विभागीय समिती अमरावती विभागातील प्रस्तावांची छाननी करुन अंतीम गुणांकन करणार आहे. ‍

त्याचबरोबर या नवीन शासन निर्णयानुसार पुरस्कारांच्या रकमेतही भरीव वाढ करण्यात आली आहे. मुद्रित माध्यम गटासाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर प्रत्येकी तीन पुरस्कार देण्यात येतील. यामध्ये जिल्हा स्तरावरील प्रथम क्रमांकाला 31 हजार, व्दितीय क्रमांकास 21 हजार, तृतीय क्रमांकास 15 हजार, विभागीय स्तरावरील प्रथम क्रमांकाला 50 हजार, व्दितीय क्रमांकाला 35 हजार, तृतीय क्रमांकाला 25 हजार तर राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाला 1 लाख, व्दितीय क्रमांकाला 71 हजार, तृतीय क्रमांकाला 51 हजार असे बक्षीस देण्यात येते, या स्पर्धेतील सर्व विजेत्यांना स्मृतीचिन्ह देण्यात येते.

इलेक्ट्रानिक माध्यमातील मराठी वृत्तकथा प्रसारित करणाऱ्यांना राज्यस्तरावर तीन पुरस्कार देण्यात येतात. त्यामध्ये प्रथम क्रमांकास 1 लाख रुपये, व्दितीय क्रमांकास 71 हजार तर तृतीय क्रमांकास 51 हजारांचे बक्षीस देण्यात येते. याच बरोबर प्रत्येक विजेत्यास स्मृती चिन्ह देण्यात येते.

जलयुक्त शिवार अभियानाबाबत जनजागृती, अभियानात लोकसहभाग वाढविणे, पाण्याचा ताळेबंद व कार्यक्षम वापर, पाणलोटाच्या यशोगाथा प्रकाशित करणे, इतर गावांना प्रोत्साहित करून पाणी प्रश्न सोडविण्यासाठी योगदान देणाऱ्या पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात येतो.

गत वर्षीपासून या पुरस्काराला सुरूवात करण्यात आली असून यासंबंधीचा शासन निर्णय ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दि. 28 सष्टेबर 2016 व दि. 24 आक्टोबर 2016 रोजी निर्गमीत केला आहे.

राज्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागीय स्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार तर जिल्हा स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार या नावाने पुरस्कार देण्यात येतात.

या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यात प्रकाशित होणाऱ्या मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेतील साप्ताहिके व पाक्षिकांतील लिखाणाचा विचार केला जाईल. या पुरस्कारासाठी मुद्रित माध्यम आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम असे गट करण्यात आले आहेत. दि. 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत प्रसिध्द झालेल्या बातम्यांचा या पुरस्कारासाठी विचार केला जाईल.

मुद्रित माध्यम गटासाठी वृत्तपत्रांचे बातमीदार, स्तंभलेखक, मुक्त पत्रकार या पुरस्कार स्पर्धेत भाग घेण्यास पात्र असतील. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रसिध्द केलेल्या साहित्याचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येईल. उमेदवारास ज्या स्तरावरील पारितोषिकासाठी अर्ज करावयाचा आहे, त्या स्तरावरील समितीच्या सदस्य सचिवांकडे अर्ज करता येईल. मात्र कोणत्याही एका पारितोषिकासाठीच अर्ज करता येईल.

पुरस्कारासाठी मागील पाच वर्षाची कामगिरी, त्याची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल. सलग दोन वर्षे एकाच पत्रकारास पुरस्कार प्राप्त झाल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका स्विकारली जाणार नाही.

स्पर्धेत भाग घेत असलेल्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. प्रवेशिकेसोबत कोणाचेही शिफारस पत्र जोडण्याची आवश्यकता नाही.

पुरस्कारासाठी पाठवायच्या प्रवेशिकेसोबत मूळ लिखाणाची कागदपत्रे त्यांच्या दोन प्रतीसह पाठवावे लागतील. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका त्यासोबत पाठविलेली लेखांची कात्रणे निटनेटकी असणे आवश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड केलेली कागदपत्रे, न वाचता येणाऱ्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही, अशा प्रवेशिका रद्द समजल्या जातील.

पुरस्कार पात्रतेच्या अटी व शर्तीच्या अधिक माहितीसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दि. 28 सप्टेबर व दि. 24 आक्टोबर 2016 तसेच 9 ऑगस्ट 2017 रोजी निर्गमीत केलेले शासन निर्णय पाहावेत. प्रत्येक स्तरावरील पुरस्कारासाठी एकापेक्षा अधिक प्रवेशिका पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.

दि. 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत प्रसिध्द झालेल्या बातम्यांच्या कात्रणांसह आपल्या प्रवेशिका दि. 20 आक्टोबर 2017 पूर्वी पोहोचतील या बेताने जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी संबंधित जिल्हा माहिती कार्यालय तसेच विभागीय स्तरावरील पुरस्कारासाठी विभागीय कार्यालय पुणे येथे पाठवाव्यात. उशीरा आलेल्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही.

 

 

 

 

 

Web Title: Increase in the amount of water scarcity journalist award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.