गावनिहाय आराखडा करून तपासण्या वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:18 AM2021-06-03T04:18:07+5:302021-06-03T04:18:07+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण व मृत्यूदर कमी करण्यासाठी गावनिहाय आराखडा तयार करून तपासण्या वाढवा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण व मृत्यूदर कमी करण्यासाठी गावनिहाय आराखडा तयार करून तपासण्या वाढवा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी दिल्या. पुरामुळे बाधित होणाऱ्या भागातील ज्येष्ठ नागरिक, मदतकार्यात सहभागी नावाडी व रेस्क्यू फोर्सचे तरुण यांचे लसीकरण प्राधान्याने करून घेण्याचा निर्णय यावेळी झाला.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना नियंत्रणासाठी नियुक्त केलेल्या पथक प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अँटिजन किटचे योग्य प्रमाणात वाटप करावे. रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार अंमलबजावणी करावी. रुग्णांना वेळेत उपचार मिळवून द्या, चांगले काम करत असलेल्या ग्रामसमित्या व सरपंच यांचे अनुकरण अन्य गावांनी करावे, ग्रामस्तरीय अलगीकरण कक्ष सुरू करा.
करवीर, शिरोळ, हातकणंगलेवर विशेष लक्ष द्या...
हातकणंगले, शिरोळ, करवीर अशा रुग्णदर अधिक असणाऱ्या तालुक्यातील अधिकाऱ्यांनी कडक उपाययोजना राबवाव्यात. महाआयुष सर्व्हे अंतर्गत लक्षणे आढळणाऱ्या ६० वर्षांवरील नागरिकांची तत्काळ तपासणी करून घेऊन बाधितांना वेळेत उपचार मिळवून द्या, या सर्व्हेचे काम गतीने पूर्ण करा.
---
१५ दिवसांचा औषध साठा ठेवा
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी किमान १५ दिवसांचा औषधांचा साठा प्रत्येक शासकीय कोविड केंद्र, कोविड केअर सेंटरमध्ये ठेवा, औषधे शासनाकडून मागविणे किंवा स्थानिकरित्या खरेदी करणे याचे योग्य नियोजन करावे. या ठिकाणी आवश्यक त्या वैद्यकीय सेवासुविधा, स्वच्छता, औषधसाठा आहे का, याची वेळोवेळी तपासणी करावी अशा सूचना केल्या.
---
फोटो नं ०२०६२०२१-कोल-कोरोना आढावा बैठक
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी विभागप्रमुख व विविध पथकांच्या प्रमुखांना मार्गदर्शन केले.
---