दिवाळी धुमधडाक्यात झाली, कोल्हापुरात उच्चांकी ध्वनीपातळी गाठली; शिवाजी विद्यापीठाचा अहवाल

By संदीप आडनाईक | Published: November 17, 2023 07:17 PM2023-11-17T19:17:42+5:302023-11-17T19:18:02+5:30

आवाजाचे निकष कोणत्या क्षेत्रात किती डेसीबल..जाणून घ्या

Increase in noise level in Kolhapur city during Diwali | दिवाळी धुमधडाक्यात झाली, कोल्हापुरात उच्चांकी ध्वनीपातळी गाठली; शिवाजी विद्यापीठाचा अहवाल

दिवाळी धुमधडाक्यात झाली, कोल्हापुरात उच्चांकी ध्वनीपातळी गाठली; शिवाजी विद्यापीठाचा अहवाल

कोल्हापूर : दिवाळीत कोल्हापूर शहरातील ध्वनीपातळीत यंदाही आवाज वाढलेलाच राहिला. ध्वनीप्रदूषणाने कमालीची उंची गाठल्याचा अहवाल शिवाजी विदयापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने दिला आहे. यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीतही दरवर्षीपेक्षा ध्वनीप्रदूषणाची पातळी अधिकच होती. पाठोपाठ दिवाळीतील तसेच क्रिकेट सामन्यानंतरच्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वाढलेल्या ध्वनीपातळीत भर पडल्याने कोल्हापूरकरांना प्रदूषणाचा हा धोक्याचा इशारा मिळालेला आहे.

केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या ध्वनीपातळी मर्यादेच्या निकषानुसार दिवाळीत कोल्हापूर शहरातील चार क्षेत्रांमधील चार क्षेत्रातील २२ ठिकाणांचे शास्त्रीय मॉनिटरिंग इन्स्ट्रूमेंटचा वापर करुन ध्वनीमापन सर्वेक्षण केले असता शहरात सर्वच ठिकाणी मोजलेला आवाज हा ध्वनीप्रदूषण कायदा २०००च्या मानांकनानुसार जास्त आढळून आला आहे. गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी दिवाळीत आवाजाची पातळी वाढलेली दिसून आली आहे. लक्ष्मीपूजन(१२ नोव्हेंबर), दिवाळी पाडवा(१४ नोव्हेंबर) आणि भाउबीज (१५ नोव्हेंबर) यादरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले होते. आवाजाचे निकष रात्रीत शांतता क्षेत्रात ४०, निवासी क्षेत्रात ४५, व्यावसायिक क्षेत्रात ५५ आणि औद्योगिक क्षेत्रात ७० डेसीबल इतके असते.

हा अहवाल शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत, पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रभारी विभाग प्रमुख आणि अधिव्याख्याता प्रा. डॉ. आसावरी जाधव आणि प्रा. चेतन भोसले यांच्यासह सूरज चावरे आणि अमन मुजावर या एमएस्सीच्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे.


सर्वेक्षणाची जागा  - लक्ष्मीपूजन - दिवाळी पाडवा - भाउबीज

शांतता क्षेत्र

सीपीआर    -  ६७.२   -   ६३.९   -  ६३.३
जिल्हाधिकारी कार्यालय  -  ५५.८  - ५९.३   - ६०.२
जिल्हा न्यायालय    -  ६५.३   -  ६५.०   -  ७१.२
शिवाजी विद्यापीठ   -   ६०.५   -   ५१.१  -  ४९.८

रहिवाशी क्षेत्र :
शिवाजी पेठ    -   ८८.२   -  ७५.२   -   ७४.१
मंगळवार पेठ  -  ८३.१  -  ७२.४  -   ७६.०
उत्तरेश्वर पेठ   -  ८१.१   -   ७२.४  -   ६८.४
राजारामपुरी -    ६५.६ -   ६५.८  -   ६६.८
नागाळा पार्क   -   ६०.९  -   ६०.१   -   ६४.९
ताराबाई पार्क   -   ६६.०   -   ६७.१   -   ६४.९

व्यापारी क्षेत्र
लक्ष्मीपुरी   -   ६६.०  -   ६६.५  -   ६६.६
बिंदू चौक   -   ७९.४  -   ७८.३   -  ७५.२
मिरजकर तिकटी -  ८०.३   -   ७६.७  -   ७५.७
बिनखांबी गणेश मंदिर - ७६.०   -   ७८.८   -   ७८.८
महाद्वार रोड  -   ७५.२   -   ७६.७    -   ७९.४
गुजरी कॉर्नर  -    ११०.२  -    ७९.५    -  ८१.१
पापाची तिकटी -  ७२.२   -  ७०.३   -   ७७.९
गंगावेश    -   ८४.५   -    ७५.४   -    ७६.१
शाहुपुरी   -   ६७.९   -   ६६.१   -  ६८.४
राजारामपुरी   -   ७४.८  -   ७६.७  -   ७१.७

औद्योगिक क्षेत्र :
वायपी पोवार नगर  - ७५.६   -  ५८.५   -  ६६.६
उद्यमनगर  -  ७६.७  -  ६१.४  -  ५९.१

Web Title: Increase in noise level in Kolhapur city during Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.