कोल्हापुरात गुन्हेगारांच्या संख्येत वाढ, गेल्या वर्षभरात वॉन्टेडच्या यादीत ६० जणांची भर; पानसरे हत्येतील आरोपी मोकाटच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 02:45 PM2023-02-01T14:45:00+5:302023-02-01T14:45:33+5:30

केवळ २१ गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश

Increase in number of criminals in Kolhapur, 60 added to wanted list in last year | कोल्हापुरात गुन्हेगारांच्या संख्येत वाढ, गेल्या वर्षभरात वॉन्टेडच्या यादीत ६० जणांची भर; पानसरे हत्येतील आरोपी मोकाटच

कोल्हापुरात गुन्हेगारांच्या संख्येत वाढ, गेल्या वर्षभरात वॉन्टेडच्या यादीत ६० जणांची भर; पानसरे हत्येतील आरोपी मोकाटच

googlenewsNext

उद्धव गोडसे

कोल्हापूर : विविध प्रकारचे गुन्हे करून परागंदा होणाऱ्या गुन्हेगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार आणि पाहिजे असलेले असे ६९८ गुन्हेगार असून, यात कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांसह अवैध व्यवसाय चालवणाऱ्या सूत्रधारांचाही समावेश आहे. गेल्या वर्षभरात वॉन्टेडच्या यादीत ६० गुन्हेगारांची भर पडली, तर केवळ २१ गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश आले. 

घरफोड्या, चोऱ्या, अवैध व्यवसाय, मद्य तस्करी, मारामारी अशा गुन्ह्यांमधील काही सराईत गुन्हेगारही वर्षानुवर्षे पोलिसांच्या वॉन्टेड यादीत आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

नव्याने ६० गुन्हेगारांची भर

वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत गतवर्षी ६० गुन्हेगारांची भर पडली. त्यामुळे एकूण फरार आणि पाहिजे असलेल्या गुन्हेगारांची संख्या ६९८ झाली. यात फरार असलेले ४१, तर वॉन्टेड असलेल्या ६५७ गुन्हेगारांचा समावेश आहे. बहुतांश गुन्हेगार घरफोड्या, फसवणूक, मारामारी आणि अवैध व्यवसायांमधील आहेत.

पानसरे हत्येतील आरोपी मोकाटच

कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी १२ संशयितांवर आरोपपत्र दाखल केले आहे. त्यापैकी १० संशयित अटकेत आहेत, तर सारंग आकोळकर आणि विनय पवार हे दोघे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. गेल्या आठ वर्षांपासून विविध तपास यंत्रणांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

कोराणे, सावलाचाही शोध सुरू

मटका आणि जुगार अड्डे चालवणारे सम्राट कोराणे, पप्पू सावला, सुनील तेलनाडे या आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई केल्यानंतरही ते पोलिसांना सापडलेले नाहीत. जिल्ह्यातील अनेक अवैध धंद्यांचे सूत्रधारच हे आरोपी असल्यामुळे त्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

पोलिसांसमोरील आव्हाने

अनेकदा फिर्यादींची नोंद होताना संशयितांची बोगस आणि चुकीच्या नावांची नोंद होते. आरोपींचा नेमका पत्ता उपलब्ध नसतो. आरोपी सतत स्वत:चे ठिकाण बदलून पोलिसांना गुंगारा देतात. त्यामुळे वॉन्टेड आरोपी पकडण्यात अडचणी येत असल्याचे पोलिस अधिकारी सांगतात.

२१ गुन्हेगारांना अटक

गतवर्षी फरार आणि पाहिजे असलेल्या ६९८ गुन्हेगारांपैकी केवळ २१ गुन्हेगारांना अटक करण्यात अपयश आले. वॉन्टेडपैकी १९, तर फरार असलेले दोन गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले. यातील १२ आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडले.

वॉन्टेड, फरार आरोपी

आरोपी - संख्या
जिल्ह्यातील - २४७
परजिल्ह्यांतील - २२३
परराज्यांतील - २२३
परदेशातील - ५

गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यास प्राधान्य दिले जात आहे. परजिल्ह्यांतील आणि राज्याबाहेरील वॉन्टेड गुन्हेगारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अटकेतील गुन्हेगारांची संख्या कमी दिसते. - शैलेश बलकवडे - पोलिस अधीक्षक.

Web Title: Increase in number of criminals in Kolhapur, 60 added to wanted list in last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.