कोल्हापुरात पंचगंगेसह कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ, नृसिंहवाडीत दत्त मंदिराजवळ आले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 01:14 PM2023-07-20T13:14:36+5:302023-07-20T14:01:59+5:30
शिरोळ-कुरुंदवाड जुना मार्ग वाहतुकीसाठी बंद
शिरोळ / कुरुंदवाड / नृसिंहवाडी : पावसाने जोर धरल्याने व पाणलोट क्षेत्रात धुवांधार पाऊस होत असल्याने पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे या नदीवरील शिरोळ तालुक्यातील तेरवाड व शिरोळ बंधारा पाण्याखाली गेला आहे. तर येथील अनवडी पुलावर पंचगंगा नदीचे पाणी आल्याने शिरोळ-कुरुंदवाड जुना मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. नृसिंहवाडी येथील दत्त मंदिराजवळ कृष्णेचे पाणी आले आहे. दरम्यान, संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले आहे.
धरण क्षेत्रात कोसळणाऱ्या पावसामुळे पंचगंगेसह कृष्णा नदीच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ होत असून, बुधवारी दुपारी राजापूर बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कुरूंदवाडचे सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी राजापूर बंधाऱ्याची पाहणी करून पाटबंधारेच्या कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून शिरोळ तालुक्यात पावसाची रिपरिप असल्याने शेतकरी सुखावला आहे. सोयाबीन, भुईमूग, कडधान्ये, भात पिकांच्या पेरणीबरोबरच ऊस लागणीची लगबग सुरू झाली आहे. पावसामुळे शेतीची कामे एकदमच सुरू केल्याने शेतकऱ्यांना शेतमजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.
नृसिंहवाडी येथील कृष्णेच्या पातळीत पाच फुटाने वाढ झाली असून, दत्त मंदिरासमोरील खालील कट्टयावर पाणी पोहोचले आहे. तर येथील कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर असलेल्या संगमेश्वर मंदिराला पाण्याने वेढा दिला आहे. येथील दत्त देव संस्थानने मंदिर परिसरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास सुरुवात केली आहे.