कोल्हापूर: कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ; नृसिंहवाडीतील दत्त मंदिर गेलं पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 04:14 PM2022-08-12T16:14:36+5:302022-08-12T16:56:35+5:30
मंदिर परिसरातील सर्व साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले
प्रशांत कोडणीकर
नृसिंहवाडी : परिसरात पावसाने उघडीप दिली असली तरी कोयना, राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे गेल्या 24 तासात कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळी दोन फुटाने वाढ झाली असून येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. दरम्यान श्रींची उत्सवमूर्ती येथील परंपरेनुसार श्री नारायण स्वामी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. तेथे त्रिकाल पूजा अर्चा चालू आहे.
दत्त मंदिर पाण्याखाली गेल्याने देवस्थानमार्फत मंदिर परिसरातील सर्व साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. मंदिर परिसरातील वेदमूर्ती भैरंभट जेरे पुजारी प्रसादालय, धार्मिक विधी हॉल, दशक्रिया विधी हॉल या ठिकाणी पुराचे पाणी आले आहे. बाबर प्लॉटमधील रामनगर येथील काही भागात पाणी शिरु लागल्याने येथील नागरिक स्थलांतराच्या तयारीत आहेत.
नृसिंहवाडी गावच्या तिन्ही बाजूंनी नदी असल्याने पुराचे पाणी गावाला वेढण्यास सुरुवात झाली आहे. नृसिंहवाडी-औरवाड या मार्गावरील जुना पूल पाण्याखाली गेला असला तरी नवीन पुलावरून वाहतूक सुरु आहे.