वन्यजीव-मानव संघर्षात वाढ; ..यामुळे बिबट्या, गवा, अस्वल, हत्तींचा मानवी वस्तीत शिरकाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 11:53 AM2022-02-17T11:53:46+5:302022-02-17T11:54:54+5:30

जशा मानवाच्या चुका आहेत, त्याप्रमाणेच बदललेले वातावरण आणि हवामानाचेही कारण

Increase in wildlife-human conflict in Kolhapur district; Due to this, leopards, gaur, bears and elephants infiltrated human settlements | वन्यजीव-मानव संघर्षात वाढ; ..यामुळे बिबट्या, गवा, अस्वल, हत्तींचा मानवी वस्तीत शिरकाव

वन्यजीव-मानव संघर्षात वाढ; ..यामुळे बिबट्या, गवा, अस्वल, हत्तींचा मानवी वस्तीत शिरकाव

googlenewsNext

संदीप आडनाईक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील वन्यजीव-मानव संघर्ष गेल्या काही वर्षात वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जशा मानवाच्या चुका आहेत, त्याप्रमाणेच बदललेले वातावरण आणि हवामानाचेही कारण आहे.

जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटातील वनसंपदेत कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो. त्यातील राधानगरी आणि दाजीपूर या ३५१.१६ चौ. किलोमीटरवर पसरलेल्या या दोन्ही अभयारण्यांत अनेक वन्यजीवांचा वावर आहे. गव्यांसाठी राखीव असलेल्या या अभयारण्यात वाघाशिवाय बिबट्या, अस्वल, हत्ती यांचाही रहिवास आहे.

या वन्यजीवांसाठी अन्न आणि पाण्याचा तो सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्याच्या कमतरतेमुळे हे वन्यजीव मानवी वस्तीत शिरु लागले आणि हा वन्यजीव-मानव संघर्ष आणखी तीव्र झाला.

सोमवारी चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी भागात अस्वलाने केलेल्या हल्ल्यात एकजण जखमी झाला. काही महिन्यापूर्वी गव्याने आपले वास्तव्य सोडून शहर गाठले आणि त्यांच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला, काहीजण जखमीही झाले. तर हत्तींनीही मार्ग बदलून शहर गाठले. या प्राण्यांमुळे ऊस, शाळू, मका, भात यासारखे पीक उद्ध्वस्त झाल्याच्या घटना राधानगरी, शाहुवाडी, पन्हाळा आणि करवीर तालुक्यांत घडल्या आहेत.

अर्थात या संघर्षात मानवाचाही मोठा हात आहे. खाणकाम, भरमसाठ जंगलतोड, पीक पद्धतीत अमाप बदल, भूजलाचा बेसुमार उपसा, त्यामुळे झालेले पाण्याचे दुर्भीक्ष्य, पाण्याचा खालावलेला दर्जा आदींचाही वाटा आहे. शिवाय बदलत्या निसर्गाचाही तितकाच हातभार आहे.

त्यामुळे शेती, माती, हवामान आणि वातावरण यात बदल झाल्याने वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष टोकाला जात आहे. लहरी पाऊसमान, बॉक्साईडसारख्या खाणकामांमुळे नष्ट झालेली गायराने, कुरणं, कोरडे पडलेले पाणवठे, कारवीसारखी वनस्पती यामुळे वन्यजीव मानवी वस्तीकडे वळत आहेत.

गेल्या दहा वर्षांत मोठी आणि बेसुमार जंगलतोड झाली आहे. त्याचा परिणाम वातावरणाच्या चक्रावर झाला आहे. त्यामुळे प्राण्यांना आवश्यक क्षार आणि पोषक तत्त्वं मिळू शकलेली नाहीत. याशिवाय त्यांच्या अधिवासात मानवाने हस्तक्षेप केला आहे. - अमित सय्यद, वन्यजीव संशोधक, अध्यक्ष, वन्यजीव संरक्षण व संशोधन संस्था.
 

कचरा, फेकून दिलेले खाद्य व इतर अनेक कारणांमुळे वन्यजीव मानवी वस्तीजवळ येत आहेत. कोणताही वन्यजीव स्वत:ला धोका असल्याशिवाय हल्ला करत नाही. त्यामुळे स्वत:वर संयम ठेवा, एकट्याने आडवाटेला जाऊ नका, दवंडी द्या, सावध राहा. - सुनील लिमये, मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

Web Title: Increase in wildlife-human conflict in Kolhapur district; Due to this, leopards, gaur, bears and elephants infiltrated human settlements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.