सवलत, योजनांद्वारे उद्योग वाढवा
By admin | Published: November 23, 2014 11:20 PM2014-11-23T23:20:40+5:302014-11-23T23:59:19+5:30
अभय दप्तरदार : स्थानिक बाजारपेठेसह सरकारच्या विविध प्रकल्पांना आवश्यक साहित्य; उत्पादन खरेदीत प्राधान्य
कोल्हापूर : यंत्रसामग्री, निर्यात आदींबाबत ‘एमएसएमई’च्या माध्यमातून विविध योजना, सवलती देण्यात येतात. मात्र, त्याचा फायदा घेणाऱ्या उद्योजकांचे प्रमाण कमी आहे. ते चित्र बदलण्यासाठी या सवलती, योजनांच्या फायदा घेऊन उद्योग वाढवा, असे आवाहन केंद्र सरकारच्या महाराष्ट्र स्मॉल स्केल्स्, मीडियम एंटरप्रायजेसचे (एमएसएमई) साहाय्यक संचालक अभय दप्तरदार यांनी आज, रविवारी येथे उद्योजकांना केले.
कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स, अर्थमुव्हर्स असोसिएशनतर्फे आयोजित ‘इंडस्ट्रिया २०१४’ या प्रदर्शनातील ‘बायर्स सेलर्स मीट व व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोगॅम’मध्ये ते बोलत होते. येथील शाहूपुरी जिमखाना मैदानावरील प्रदर्शनातील या कार्यक्रमास मुंबई पोर्ट ट्रस्टचे मटेरिअल मॅनेजर एस. के. शर्मा, नॅशनल स्मॉल स्केल्स इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापक विनोदकुमार प्रमुख उपस्थित होते.
दप्तरदार म्हणाले, लघुउद्योजकांना बळ देण्यासाठी त्यांना स्थानिक बाजारपेठेसह सरकारच्या विविध प्रकल्पांना आवश्यक साहित्य, उत्पादन खरेदीत प्राधान्य आहे. त्यासह यंत्रसामग्री, निर्यात आदींबाबत अनुदान, सवलत, योजना आहेत. पण, त्यांच्या अधिकतर उद्योजक लाभ घेत नाहीत. उद्योग वाढविण्यासाठी ‘एमएसएमई’च्या योजना, सवलतींचा फायदा उद्योजकांनी घ्यावा. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांच्या विकासासाठी प्रशिक्षण, कार्यशाळा व प्रदर्शनाचे आम्ही आयोजन करतो. उद्योगवाढीसाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल.
यावेळी शर्मा यांनी पोर्टतर्फे लघुउद्योजकांना योजना, उत्पादनांची माहिती दिली. विनोदकुमार यांनी ‘एनएसआयसी’तर्फे लागू केलेल्या योजनांची माहिती दिली. त्यासाठी नावनोंदणी करणाऱ्या उद्योजकांना ‘अर्नेस्ट मनी’ माफ केला जातो. उद्योगांचे आधुनिकीकरण, विस्तार, आयात-निर्यात वाढ, आदींबाबत ‘एनएसआयसी’च्या प्रोत्साहनपर योजना असून, त्याचा उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांनी चित्रफीतींद्वारे लघुउद्योजकांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने, ‘स्मॅक’चे अध्यक्ष सुरेंद्र जैन, ‘मॅक’चे अध्यक्ष मोहन कुशिरे, देवेंद्र दिवाण, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दुसऱ्या दिवशीही प्रदर्शन हाऊसफुल्ल
विविध तांत्रिक, नावीन्यपूर्ण उपकरणे, औद्योगिक उत्पादनांची माहिती घेण्यासाठी रविवारची सुटी साधत आज कोल्हापूरसह सांगली, सातारा, हुबळी-धारवाड, गोवा, आदी ठिकाणांहून उद्योजक, नागरिकांनी सकाळपासून गर्दी करण्यास सुरुवात केली. पॅकेजिंगच्या पिनपासून जेसीबीपर्यंतच्या उत्पादनांची उद्योजक, नागरिक बारकाईने माहिती घेत होते. दुपारनंतर प्रदर्शनस्थळ ‘हाऊसफुल्ल’ झाले. प्रदर्शनात १२५ स्टॉल असून, त्यात फौंड्री, वस्त्रोद्योग, पॅकेजिंग, सोलर, सीएनसी-व्हीएमसी आदींचा समावेश आहे. प्रदर्शनाचा बुधवारी (दि. २६) समारोप होणार आहे.